शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा; हे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही!
मुंबई | मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे की, यावर लवकर तोडगा काढा; हे दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली. म्हणाले, शेती आणि अन्न पुरवठ्यात सगळ्यात जास्त योगदान पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांचे आहे.
त्यांच्याच भरोशावर जगातील १७-१८ देशांना भारत धान्य पुरवतो. पंजाब व हरियाणातील शेतकरी रस्त्यावर येतो याची फार गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. पण, दुर्दैवाने ती घेतलेली दिसत नाही. मला वाटतं की, असेच सुरू राहिले तर हे आंदोलन दिल्लीपुरते सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील. सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशी माझी अपेक्षा आहे.