Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

…तर खासदारकीचा राजीनामा देईन; संभाजीराजे छत्रपतींचा भाजपाला इशारा!

Spread the love

सोलापूर | राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्य दौऱ्यावर आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईन..

संभाजीराजे छत्रपती सोलापुरात आले असता पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी थेट राजीनामा द्यायला तयार असल्याचं बोलून दाखवलं. राजीनाम्याने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईन, असं असं ते म्हणाले. संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप खासदार संभाजी छत्रपती आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.

संभाजी छत्रपती 27 मे रोजी मुंबईत जाणार..

संभाजी छत्रपती यांनी आज कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून या दौऱ्यामागची भूमिका स्पष्ट केली. माझा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. मराठवाडा आणि खान्देशात जाऊन तिथे समाजाची भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर 27 मे रोजी मुंबईत जाणार आहेत.

मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली..

मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

Exit mobile version