मुंबई आणि बारामती सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची पुन्हा एकदा मोठी कारवाई!
मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील मोगावीरा सहकारी बँक लिमिडेटसह 3 बँकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या तिन्ही बँकांना 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तपासणीत अनियमितता निदर्शनास आल्याने कारवाई
मोगावीरा सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अहवालात अनेक अनियमतता आढळून आल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. बँकेतील निष्क्रिय असलेल्या खात्यांचे अनेक वर्षांपासून ऑडिट झाले नव्हते. तसेच DEA फंडातील अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचे दिसून आले. तसेच मोगावीरा बँकेने जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था केली नव्हती.
तर इंदापूर सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेबाबत व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते. या बँकेतही जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
यापूर्वीही कारवाई
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.