Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

खबरदार! मला बोलायला लावू नका; मातोश्रीच्या कोणत्या भानगडी काढणार राणे?

Spread the love

मुंबई | मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. मातोश्रीवर काय काय घडले, आतलेबाहेरचे सगळे मला ठाऊक आहे. तोंड उघडायला लावू नका. यापुढे भाजप वा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध बोललात तर सगळं काही बाहेर काढेल आणि मग तुम्हाला पळता भुई थोडी होईल असा सज्जड दम माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदींवर बरेच तोंडसुख घेतले होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात स्वत:च्या कुटुंबाला क्लीन चिट दिली होती. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या विधानांचा उल्लेख करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. राणे यांनी या सगळ्याच गोष्टींवर भाष्य करताना उद्धव यांना पत्र परिषदेत घायाळ केले. आता शिवसेना काय बोलणार ते पहायचे.

राणे पत्रपरिषदेत आक्रमक होते. त्यांनी उद्धव यांना सुनावले की,  सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नव्हती, ती हत्याच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहेच. आज जे मी बोलतोय ते सीबीआय पाहतच असेल त्यांनी बोलावले तर मी, माझी मुले (नितेश, नीलेश)  त्या बाबतची माहिती देऊ. स्वत:च्या मुलाला क्विनचिट देण्याचा ठाकरेंना काय अधिकार? पोलिसांचा वापर करून ते मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा हल्लाबोल राणे यांनी केला. ठाकरे यांनी भाजपवाल्यांना बेडूक म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले, तुम्ही तर गांडूळ आहात. त्याला दोन तोंडे असतात. तुम्ही हिंदुत्व सोडले, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलात, आता पुन्हा हिंदुत्ववादी असल्याचे सांगत आहात. कोणतीही धमक नसलेला हा मुख्यमंत्री आहे. मराठा समाजाचा ते द्वेष करतात, या समाजाला ते कधीही आरक्षण देणार नाहीत. धनगर समाजालादेखील देणार नाहीत. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास नाही, जीएसटीच्या कायद्याची माहिती नाही आणि केंद्रावर टीका करायला निघाले आहेत. काय तर म्हणे, वाघाला डिवचू नका, तुम्ही वाघ आहात का? मुख्यमंत्री असूनही कोरोनाकाळात घरी बसून होतात, तुम्ही कसले वाघ, असेही राणेंनी सुनावले.

शिवसेनाप्रमुखांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव यांनी बाळासाहेबांना छळलं. दादरमधील शिवसेना भवनचे उद्घाटन दसऱ्याला करून त्याच ठिकाणी गडकरी चौकात दसरा मेळावा घ्यावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती, ती डावलून उद्धव यांनी शिवाजी पार्कवरच मेळावा घ्यायचे ठरविले. मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असे दुसºया दिवशीच्या सामनात छापून आले तेव्हा बाळासाहेबांना धक्काच बसला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असा दावा राणे यांनी केला. शिवसेनेच्या आमदार, खासदारंची कामे होत नाहीत. ते तक्रारी करताहेत. राज्यात विकास कामे होत नाहीत. राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलं आहे. त्यावर बोलायला ठाकरेंकडे वेळ नाही. त्यांचे ५६ आमदार नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आले. मुख्यमंत्री पदावर राहण्याची ठाकरेंची लायकी नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Exit mobile version