पुणे | पुण्यातील पहिल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारपासून रुग्णांवर उपचार केले जाण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली खरी; मात्र मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत नियोजनाच्या बैठकांचा सपाटा सुरू राहूनही सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्याचा मुहूर्त ठरला नाही. विभागीय आयुक्तांकडील बैठकीनंतर सेंटरबाबत निर्णय होईल, असे महापालिका सांगत आहेत. तर, सेंटर सुरू झाल्याचे लवकरच जाहीर करण्याचे मोजकेच उत्तर प्रशासनाने दिले. दुसरीकडे, मात्र, सेंटरमध्ये उपचार मिळण्याची आशा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आहे.
कोरोनाच्या साथीत रुग्णांच्या सोयीसाठी शिवाजीनगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात हे सेंटर उभारले गेले आहे. सुमारे आठशे बेडची सुविधा असलेल्या या सेंटरचे उदघाटन पालकमंत्री पवार यांच्या हस्ते रविवारी दिमाखात झाले. त्यानंतर लगेचच रुग्णांना दाखल करून उपचार मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण सेंटरच्या निर्जंतुकीकरणासाठी 24 तासांचा अवधी लागणार असल्याने येत्या मंगळवारपासून (ता.25) रुग्णांना सामावून घेतले जाईल, असे पवार यांनी कार्यक्रमात जाहीर केले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला. या पार्श्वभूमीवर सेंटर सुरू झाले का ? तिथे आता उपचार मिळतील का ? या अशी विचारणा महापालिका आणि संबंधित यंत्रणांकडे मंगळवार सकाळपासूनच करण्यात येत होती. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी सपंर्क साधला आणि सेंटर सुरू झाले का, याची विचारणा केली. मात्र, अद्यात सेंटर सुरू केलेले नसल्याचे उत्तर डॉ. हंकारे यांनी दिले. विभागीय आयुक्तांकडे बैठक असून, तित अंतिम निर्णय होणार आहे, असेही डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले. परंतु, ही सुविधा रुग्णांसाठी नेमकी कधी उपलब्ध होईल ? याचे उत्तर डॉ. हंकारे आणि महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांकडे नव्हते.
जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी यंत्रणा करीत असल्या तरी; रुग्णांना दाखल करून घेण्याबाबत मात्र नियमावली तयार केली आहे. महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना या सेंटरमध्ये दाखल करून घेतले जाणार नाही, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. सध्या जिथे कुठे उपचार सुरू आहेत; त्याचठिकाणी रुग्णांनी राहावे. नव्या रुग्णांना तेही जणांना “ऑक्सिजन’ आणि “आयसीयू’ बेडची गरज असेल, त्यांना जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये उपचार मिळतील, असे सांगण्यात आले आहे.