पुणे | पुणेकर म्हटलं समोर येतात कोणत्याही गोष्टीचा गर्व बाळगणाऱ्या, कोणत्याही गोष्टी स्वत:च कसे नंबर वन आहोत हे पटवून देणा्या व्यक्ती. पुणेकरांचा हाच स्वभाव त्यांच्यावर उलटा पडला आहे. प्रत्येक गोष्टीत बाजी मारणारे पुणेकर आता नको त्या गोष्टीतही पहिले येत आहेत. प्रश्न पडला असेल ना की, आता पुणेकरांनी असे काय केले? कोरोनाकाळात पुणेकरांचा निष्काळजीपणामुळे दिवसें दिवसें कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतेय.पुण्याने कोरोना रुग्णांमध्ये २ लाखांचा टप्पा पार केल्याने पुणेकरांवर नामुष्की ओढवलीये. २ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा पार करण्यात पुणे जिल्हा देशात पहिला ठरला आहे. पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात (ता.८) ४ हजार ११९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २ लाख १ हजार ४१९ झाली आहे.
यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ लाख ९ हजार ८३८ रुग्णांचा समावेश आहे. आज आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ८८० रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, ७४जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार १४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८६८, नगरपालिका क्षेत्रात २७९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ७८ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या चोवीस तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३५ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १६, जिल्हा परिषद क्षेत्रातील १४, नगरपालिका क्षेत्रातील ८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आता तरी पुणेकरांनी योग्य काळजी घेऊन कोरोनावर मात करायला हवी. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा पुर्ण करण्यात नव्हे तर कोरोनाबाधितांचा आकडा घटविण्यात नंबर वन यायाल हवे. त्याामुळे पुणेकरांनो, आता तरी सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळा !