Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पुणे शहर राज्यातीलच नव्हे तर देशातील हॉटस्पॉट ; दररोज 10,000 पेक्षा जास्त रुग्ण, पुणे जिल्ह्याची एकूण बेड्सची स्थिती!

Spread the love

पुणे | पुणे शहर आता राज्यातीलच नव्हे तर देशातील हॉटस्पॉट बनत आहे. रोजचे दहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात आढळून येतायत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात बेड्सची कमतरता भासायला सुरुवात झालीय. त्यामुळे आता लसीकरणावर भर द्यावा लागणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाहीय. तर दुसरीकडे जिल्ह्यात आता समूह संसर्ग सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल होताना दिसतंय.

पुणे जिल्ह्याची एकूण बेड्सची स्थिती..

ऑक्सिजन बेड्स – 7447
ऑक्सिजन विरहीत बेड्स – 31530
आयसीयु बेड्स – 2250
व्हेंटिलेटर्स बेड – 890

प्रशासनाकडून शर्थीने प्रयत्न सुरु..

कोरोना वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणावर प्रशासनाने भर दिलाय. यासाठी जिल्ह्यात शुक्रवारपासून मिशन 100 डेज ही खास मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रोज किमान 1 लाख डोस दिले जाणार आहेत. याशिवाय येत्या सोमवारी 1 लाख 10 हजार डोस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. येत्या सोमवारी दिल्या जाणाऱ्या एकूण डोसपैकी सर्वाधिक 45 हजार डोस हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, त्यापाठोपाठ 35 हजार डोस पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडमध्ये 30 हजार डोस पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आलेत.

हडपसर भागात सर्वाधिक कंटेन्मेंट झोन..

पुणे शहरात एकूण 268 मायक्रो कटेन्मेंट झोन असून यामध्ये हडपसर भागात सर्वाधिक झोन आहेत. ग्रामीण भागातही शिरूर आणि हवेली या दोन तालुक्यात सर्वाधिक कंटेन्मेंट झोन आहेत.

पुण्यात सध्या किती रुग्ण?

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 लाख 83 जार 819 रुग्ण इतकी आहे. यापैकी 2 लाख 38 हजार 890 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात सध्या 39 हजार 518 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका आहे. शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे.. त्यामुळे आता लसीकरण आणि कडक निर्बंध हाच त्यावर उपाय आहे.

Exit mobile version