Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

प्रवीणदादा गायकवाड; महाराष्ट्रातील अभ्यासू, निर्भीड आणि विधायक नेतृत्व!

Spread the love

लेख:
–डॉ.श्रीमंत कोकाटे.

सुमारे तीस वर्षांपासून प्रवीणदादा हे सार्वजनिक जीवनात आहेत. मुळात ते पुण्यातील मुंढवा येथील एका जमीनदार शेतकरी आणि आता मोठ्या बांधकाम व्यावसायिक परिवारातून आलेले आहेत. शिवाजीराजांच्या महाराणी सकवारबाई या याच गायकवाड घराण्यातील होत्या. दक्षिणदिग्विजयाप्रसंगी शिवरायांच्या सोबत असणारे सरदार बंकी गावकवाद आणि कोल्हापूरचे दिवंगत खासदार उदयसिंग गायकवाड देखील याच परिवारातील होते. अशा ऐतिहासिक घराण्याचा वारसा प्रवीणदादांना लाभलेला आहे.पण त्यांना याचा यत्किंचितही अहंकार नाही. स्वतः ते इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, शेती देखील केलेली आहे, फळे, फुले त्यांनी मार्केटयार्डात विकलेली आहेत. महान सत्यशोधकी व दिवंगत खासदार केशवराव जेधे यांच्या कुटुंबात त्यांची बहीण दिलेली आहे.तरुण वयापासून ते आणि शांताराम कुंजीर मराठा समाजासाठी काम करतात. पण ओबीसी, एससी एसटी मुस्लिम यांच्याशी सुसंवाद कायम राहावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, पी. ए. इनामदार, ऍड. प्रकाश आंबेडकर, प्रदीप ढोबळे, ऍड. सुरेश माने, विचारवंत हरी नरके इत्यादींशी त्यांचा खूप चांगला ऋणानुबंध आहे.

प्रवीणदादा हे खूप अभ्यासू आहेत, अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे,शिवाजीराजांच्या इतिहासाच्या ब्राह्मणीकरणातून बहुजनांचे ब्राह्मणीकरण या विषयावर त्यांनी महाराष्ट्रभर प्रबोधन केले. इतिहासाचे विकृतीकरण करणारांच्या विरोधात ते नेहमी निर्भीडपणे भूमिका घेतात,”पती माझे छत्रपती” असे विडंबन करणाऱ्या मच्छिन्द्र कांबळी यांच्याविरुद्ध त्यांनी पुण्यात आंदोलन केले.भांडारकर प्रकरण,दादोजी कोंडदेव पुतळा हटवणे, वाघ्या कुत्रा, गडकरी पुतळा, मराठा आरक्षण इत्यादी प्रकरणात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे. संभाजी ब्रिगेडचे नेतृत्व त्यांनी अत्यंत हिंमतीने केले.त्यासाठी त्यांनी राज्यभर लाखो किलोमीटरचा प्रवास केला.जिजाऊ रथ यात्रेत सतत 108 दिवस म्हणजे सुमारे साडेतीन महिने जीव धोक्यात घालून ते गावोगावी गेले, भाजी भाकरी खाऊन आणि सर्वांसोबत राहून त्यांनी विचारांचा प्रचार केला. त्यांनी वृथा अभिमान बाळगला नाही.

प्रवीणदादा हे निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न नेते आहेत.त्यांना सुपारीचे देखील व्यसन नाही. त्यांच्या या गुणांचा तरुणांवर खूप मोठा प्रभाव आहे. निर्भीडपणे, आकस न बाळगता, सडेतोड, स्पष्ट, अभ्यासपूर्ण युक्तिवाद करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते ज्यावेळेस चर्चेसाठी टीव्ही वरती असतात, तेंव्हा संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे विचार एकाग्रतेने ऐकतो. त्यांची भूमिका महत्वपूर्ण मानली जाते. प्रबोधनाच्या क्षेत्रात आज त्यांचा मोठा दरारा आहे. प्रवीणदादा हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.ते कधीही भेदभाव करत नाहीत. अनेक लेखक, विचारवंत यांच्या पाठीशी ते सतत खंबीरपणे उभे असतात. अनेक व्यक्ती, संघटना यांच्या मदतीसाठी ते नेहमी पुढे असतात. चिपळूण येथील साहित्यसंमेल प्रसंगी झालेल्या वादाप्रसंगी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक नागांनाथ कोतापल्ले सरांशी सुसंवाद करून ते प्रकरण प्रविणदादा आणि सुधीर भोसले यांनी व्यवस्थित हाताळले.

इतिहासाच्या अभिमानाबरोबरच वर्तमानात जगायला शिकले पाहिजे.हा त्यांचा आग्रह असतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे,हे तरुणांना ते सतत सांगत असतात. “अहत अमेरिका तहत ऑस्ट्रेलिया अवघा मुलुख आपला” ही घोषणा त्यांनी तरुणांसाठी दिलेली आहे. उद्योग व्यवसाय करण्यासाठी अवघे विश्व खुले आहे,असा त्यांनी संदेश दिलेला आहे.त्यांनी तरुणांसाठी अनेक व्यवसायाभिमुख कार्यशाळा घेतलेल्या आहेत. प्रवीणदादा हे स्वभावाने अत्यंत मोकळे आहेत. ते स्पष्ट बोलतात, पण त्यांच्या मनात कोणत्याही स्वरूपाचे कोणत्याही प्रकारचे किल्मिश नसते.त्यांच्या बोलण्यात पराखडपणा, पण मनात गोडवा आहे.ते जसे परखड आहेत, तसेच ते खूप विनोदी आहेत. ते सहज विनोद करत असतात.त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले आहे, पण मराठी भाषेवर कमालीचे प्रभुत्व आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन प्रवीणदादांनी महाराष्ट्रभर राजा आपल्या भेटीला “शिवशाहू विचार यात्रा” काढली. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी जीवाचे रान केले.सतत सर्वांना मदत करणे, हा त्यांचा स्वभावधर्म आहे, ते नेहमी जोडण्याचे काम करतात. महाराष्ट्रातील प्रतिगामी आणि सनातनी शक्तींना शह देऊन त्यांना रोखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रवीण दादांनी केलेले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील पुरोगामी राजकारणाला मोठा आधार मिळालेला आहे. भौतिक विकासाचे कार्य किती जरी मोठे असले तरी त्याला पुरोगामी सांस्कृतिक लढ्याची जोड नसेल तर कर्तृत्व न गाजविता देखील प्रतिगामी शक्ती बहुजनसमाजावरती राज्य करतात. प्रवीणदादांच्या कार्यामुळे पुरोगामी राजकारणाला सातत्याने मदत झालेली आहे. प्रवीणदादांच्या नेतृत्वाखाली नुकतेच संभाजी ब्रिगेडचे नववे राज्यस्तरीत भव्य अधिवेशन अलिबाग येथे झाले, पाटीदार नेता हार्दिक पटेल उद्घाटक, शेकापचे नेते आ.जयंत पाटील स्वागताध्यक्ष, आ.डॉ.जितेंद्र आव्हाड हे प्रमुख पाहुणे होते. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सुधीर भोसले, हिंदुराव पाटील, अमरजित पाटील, सुभाष बोरकर, शांताराम कुंजीर, राहुल बनसोड, छगन शेरे, अमोल काटे, अमोलराजे जाधवराव, सचिन सावंत देसाई इत्यादी पदाधिकारी प्रवीणदादांच्या सोबत रात्रंदिन झटले.

या अधिवेशनात सामाजिक,शैक्षणिक कार्य करणाऱ्या अजयसिंह सावंत, यशवंत गोसावी, प्रज्ञेश मोळक, चित्रकार बंडुभाऊ मोरे यांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रवीणदादा हे नेहमी सहकाऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकाचा जन्म प्रवीणदादा यांच्या प्रेरणेने झाला.”शिवचरित्राच्या माध्यमातून आपला समाज ब्राह्मणी गुलामगिरीतून बाहेर पडला पाहिजे, असे पुस्तक तुम्ही लिहा” असे प्रवीणदादांनी सुचविल्यानंतर हे पुस्तक लिहिले ते प्रवीणदादा आणि शांताराम कुंजीर यांनी शिवनेरीवरती प्रकाशित केले, या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक धमक्या आल्या परंतु प्रवीणदादा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक उपक्रमात त्यांची मोलाची साथ असते. प्रवीणदादा आणि राहुल पोकळे आयोजक असलेल्या सचित्र शिवचरित्र प्रकाशन समारंभ उधळून लावायचा प्लॅन भटी संघाने (RSS) विकाऊ लोकांना हाताशी धरून केला होता, त्या विकृतांना दादा पुरून उरले आणि देशाचे लोकप्रिय नेते खासदार शरद पवार साहेब,छत्रपती शाहू महाराज,डॉ जयसिंगराव पवार आणि पी. ए. इनामदार साहेब यांच्या हस्ते पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात ग्रंथ प्रकाशनाचा ऐतिहासिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रवीण दादा गायकवाड आणि राहुल पोकळे यांनी खूप कष्ट घेतले.

संभाजी ब्रिगेडचे विचार गावोगावी रुजविण्यासाठी जीव धोक्यात घालून अनेक वक्ते,लेखक,विचारवंतांनी कार्य केलेले आहे, त्यापैकी प्रदीप सोळुंके,श्रीमंत कोकाटे,जयश्री शेळके यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन अलिबाग अधिवेशनात सन्मानित करण्यात आले. प्रवीणदादा यांचे संबंध रॉयल फॅमिली पासून ते झोपडपट्टीपर्यंत सर्वांशी अत्यंत चांगल्या प्रकारचे आहेत. ते एक उत्तम संघटक आहेत. त्यांना लोकांना भेटायला, ओळखी करायला आणि करून द्यायला खूप आवडते. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ते आहाराबाबत कोणतेही पथ्य पाळत नाहीत, जे उपलब्ध असेल ते खाणे, हा त्यांचा कटाक्ष असतो,जेवणासाठी कार्यकर्त्याला त्रास होणार नाही. याची ते काळजी घेतात. प्रवीणदादांनी अनेक व्यक्ती,संस्था यांना आर्थिक तसेच जागा देऊन मदत केलेली आहे,त्यांची मोठी यादी देता येईल. दातृत्व म्हणजे हे देणार नेतृत्व आहे. प्रवीणदादांना या जीवनप्रवासात त्यांचे आजोबा आनंदराव गायकवाड आजी ताराबाई, मा. शरद पवार साहेब,छत्रपती शाहू महाराज, खा.विजयसिंह मोहिते पाटील, कॉ.शरद पाटील, डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.आ.ह.साळुंखे, ज्ञानेश महाराव, सतीश मगर, शशिकांत पवार, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, सुनिलबप्पा मोरे इत्यादींची मोलाची साथ लाभली. सर्व समाजातील अनेक नेत्यांप्रमाणेच प्रवीणदादांच्या भूमिकेमुळे आज मराठा, एससी, ओबीसी, मुस्लिम यांच्यामध्ये सुसंवादाचे वातावरण आहे. आजच्या तरुणांमध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा रुजविण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.

Exit mobile version