पंढरपूर | पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघांचे विद्यमान आमदार भारत भालके (नाना) यांचं रात्री उशिरा कोरोनाने निधनं झालं. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला होता. ते पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भालके यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला होता. या पूर्वी ही 30 ऑक्टोबर ला झालेल्या कोरोनावर त्यांनी मात केली होती परंतु दुसऱ्यांदा झालेल्या कोरोनाने त्यांचा घात केला. त्यांच्या किडनी आणि फुफ्फुस निकामी झालं होतं. रात्री उशिरा रुबी हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोलापूर जिल्ह्यातील रांगडा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं होतं, निवडणुकीच्या काळातील अगदी सहज साध्या गावठी भाषेतील त्यांची भाषण खूप गाजली होती. 2019मध्ये त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. स्थानिक आणि राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तळागाळातील लोकांशी असलेला थेट संपर्क, लोकांच्या सुख दुःखात सामील होण्याचा त्यांचा स्वभावगुण त्यांच्या लोकप्रियतेचे गमक होय. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सत्तेत आणि सत्तेच्या बाहेर राहूनही संघर्ष केला. पंढरपूर शहर, तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले, तसेच मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजना, पिण्याच्या पाण्याची योजना, संत, महंतांची स्मारके, अनेक गावचे रस्ते, पिण्याच्या पाणी पुरवठा योजना त्यांनी मार्गी लावल्या. सर्व सामान्यांसाठी प्रसंगी कायदा हातात घेण्यासही ते कधी घाबरले नाहीत. म्हणूनच 2014 च्या मोदी लाटेत, पंढरीत नरेंद्र मोदींची सभा होऊन ही आम. भालके विजयी झाले होते.
अबाल वृद्धांचे, युवकांचे आणि माय बहिणींचा ‘नाना आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाची जेमतेम 60 वर्षे पूर्ण करीत असताना भालके यांनी समाजमनावर अमीट छाप सोडली असून त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रचंड संघर्ष वाट्याला आला आणि अखेरीपर्यंत ते सर्व आघाड्यावर संघर्ष करीत राहिले. राज्याच्या विधानसभेत केवळ 11 वर्षात धडाडीचे लोकप्रतिनिधी म्हणून आ.भालके यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्याने एक झुंजार राजकारणी गमावला आहे, तर पंढरपूर, मंगळवेढ्याच्या जनतेने आपला लाडका नाना गमावला आहे. आम.भालके यांच्या निधनाने पंढरपूर, मंगळवेढा हे दोन्ही तालुके राजकीय दृष्टीने पोरके झाले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याने एक झुंजार नेता अकाली गमावला आहे.