Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

छत्रपतींचा आदेश; ६ जून राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे यावे!

Spread the love

नाशिक |  राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे संभाजीराजे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

ते सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी 2 जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

संभाजीराजे यांनी आतापर्यंत राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तीन दिवसांपूर्वीच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या. 6 जूनपर्यंत राज्य सरकारने या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता.

राज्याभिषेक सोहळ्याला गर्दी होणार का?

मराठा आरक्षणाशिवाय आणखी एका गोष्टीमुळे संभाजीराजे छत्रपती लोकांशी जोडले गेले आहेत. ही गोष्ट म्हणजे रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन. तब्बल 15 वर्षांपासून ते रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करत आहेत. या सोहळ्याला दरवर्षी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी येतात. गेल्यावर्षी हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा या सोहळ्याला गर्दी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version