हिंगोली | राज्य सरकारमध्ये केवळ प्रसारमाध्यमांसमोर बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या माईकसमोर येऊन बोलतात. पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेणार? त्यामुळे आता सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांचे अश्रू पाहून तरी सरकारने आता जागे झाले पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे सर्व जण मीडियात येऊन माईकसमोर बोलतात. मग प्रत्यक्ष निर्णय कोण घेणार? सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी बिलकूल गांभीर्य नाही. सरकारमधील नेत्यांकडून केवळ टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा सुरु आहे. हे सर्व थांबवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे व तात्काळ कारवाई केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.