बारामती : संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून बारामती येथे सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार वैद्यकीय मदत कक्षा’च्या माध्यमातून अवघ्या एक महिन्यात साठ रुग्णांना तब्बल तेरा लाखावून अधिक रुपयांपर्यंत मदत मिळवून देण्यात आली आहे. त्यामुळे हा कक्ष बारामती लोकसभा मतदार संघातील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
या कक्षाच्या माध्यमातून केवळ एकाच महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून २५ लाभार्थ्यांना सुमारे दहा लाखांच्या जवळपास मदतनिधी मिळवून दिला. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मोठमोठ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ३५ रुग्णांना सुमारे ७ लाखांहून अधिक रुपये बिलातून सवलत मिळवून देण्यास सहकार्य केले आहे.
खासदार शरद पवार आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून गोरगरिब आणि गरजू रुग्णांना ‘मुख्यमंत्री सहायता निधी’, ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ तसेच अन्य वैद्यकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने व मार्गदर्शन आणि समन्वयन साधून रुग्णांना निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे भूषण सुर्वे यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी ही जबाबदारी सोपवली असून सुर्वे यांनी अवघ्या एक महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून २५ लाभार्थ्यांना सुमारे दहा लाखांच्या जवळपास मदतनिधी मिळवून दिला. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मोठमोठ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ३५ रुग्णांना सुमारे ७ लाखांहून अधिक रुपये बिलातून सवलत मिळवून देण्यास सहकार्य केले. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्ष’ हा रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असल्याची भावना रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.
या कक्षाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली असून ती प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक दिल्यास शासनाच्या नि:शुल्क योजना सर्वांपर्यंत पोहोचतील या भावनेने सुर्वे यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुर्वे यांचे कौतूक केले आहे.