सर्वसामान्य जनतेची महावितरण करतेय फसवणूक? “कॅबिनेट मध्ये मांडणार विषय; हसन मुश्रीफ!
कोल्हापूर | संचारबंदीच्या काळातील वीज बिले माफ करण्याचा विषय कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली. या वेळी सर्वपक्षीय कृती समितीने सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जनता बिल भरणार नाही, असा इशारा दिला. तसेच महावितरणला कोणत्याही वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन डिस्कनेक्ट करू देणार नाही, असेही स्पष्ट केले.
संचारबंदीच्या काळात वीज ग्राहकांनी जादा विजेचा वापर केल्याचा व वीजदरवाढीचा आधार घेऊन महावितरणने ग्राहकांना बिले पाठवली आहेत. ग्राहकांच्या मते ही बिले वाढीव असून, ती भरण्यासाठी हाती पैसा नसल्याचे कारण आहे. संचारबंदीच्या काळात हातावरच्या पोटांना कामच मिळाले नसल्याने वीज बिले भरायची, कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ही बिले सरकारने माफ करावीत, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे आंदोलन छेडण्यात आले आहे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर वीज बिल माफ करण्याची मागणी केल्यानंतर समितीने आज ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भेट घेतली.