पुणे | पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या संकट काळात कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक होवू नये यासाठी मानवतेच्या भावनेने सर्वांनी मिळून मदत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केली. तसेच या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबाफुले जन आरोग्य योजनेबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून संवाद साधला. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे विभागीय समन्वयक डॉ अमोल म्हस्के, जिल्हा समन्वयक डॉ सागर पाटील, डॉ प्रिती लोखंडे, एम.डी. इंडियाचे प्रतिनिधी अविनाश बागडे उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नांदापूरकर यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्ह्यात अमंलबजावणीच्या अनुषंगाने रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी २ हजार ६०९, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी २ हजार ३१, पुणे जिल्ह्यतील ग्रामीण भागातील रुग्णालयांनी ६८७ असे एकूण ५ हजार ३२७ रुग्णांला लाभ देण्यात आलेला आहे. यातून असे निदर्शनात येते की, काही रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. परंतु काही रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ देण्यामध्ये कमी पडलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी याप्रकरणी गांभीर्याने व संवेदनशीलतेने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी, कोरोना बाधित रुग्णाला मदत करावी, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच आरोग्य मित्र यांच्या समन्वयाने रुग्णालयांनी काम करावे.
ही योजना सर्व लोकप्रतिनिधींमार्फत सर्व नागरिकांपर्यत पोहचवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या. रुग्णालयांच्या प्रलंबित देयकाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता रुग्णालयांकडून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आले.