मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरीही बरसल्या. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
8,9 जानेवारी, उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता.
मुंबई, ठाणे कोकणात ~27-28°C
नंदूरबार, धुळे~ 22-24°C
विदर्भ ~35°CToday Mumbai Tmax
Santacruz 30.3°C
Colaba 27.5°C pic.twitter.com/Lc7gYeYoAe— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 6, 2021
पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच, 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
अवकाळी पावसामुळे कांदा शेतकऱ्यांचं नुकसान
सततच्या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक कांद्याचे रोप खराब झाले तर लागवड केलेला उन्हाळ कांद्यावर मावा, करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मोठ्या प्रमाणावर कांदे मरत आहे. कांद्यावर केलेला खर्चही निघनार नसल्याने अखेरीस नाशिक देवळा तालुक्यातील खामखेडा इथल्या शेतकरी समाधान आहेर यांनी आपल्या पाच एकर क्षेत्राकर नुकतीच लागवड केलेल्या कांदा पिकात मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे.