Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्रात बदललेल्या नियमानुसार १ ते २ गुंठ्याचे दस्त करू शकता पण तुम्हाला ही गोष्ट असणं गरजेचं आहे !

Spread the love

संपादकीय लेख | महाराष्ट्रात शेतजमिनीची खरेदी – विक्री ही होतच असते. गेल्या काही वर्षांत राज्यातील जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, याचमुळे जमिनीचे तुकडे करून ते तुकडे विकण्याचे प्रकार देखील वाढले होते. आपल्या राज्यात तर तुकडेबंदी कायदा लागू आहे; तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही म्हणजेच शेजमीन विकत घेण्यासाठी काही गुंठ्यांची मर्यादा आखून देण्यात आली आहे.

हा कायदा लागू असला तरी राज्यात गेल्या काही वर्षात एक गुंठा, दोन गुंठे, तीन गुंठे अशा स्वरूपात गुंठ्यांमध्ये ही शेतजमीन विकत घेतली जात होती आणि त्यांची दस्त नोंदणी देखील होत होती म्हणजेच ती संबंधितांच्या नावावर देखील केली जात होती, हे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळेच राज्य सरकारने याबाबत चौकशी करण्यातही नोंदणी व मुद्रणशुल्क विभागाला आदेश दिले होते.

या विभागाने चौकशीनंतर आता एक नवं परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार जर गुंठ्यांमध्ये शेतजमिनीची खरेदी-विक्री होत असेल तर काय करायचे या संदर्भात राज्यातल्या सर्वच दुय्यम निबंधकांना सूचना जारी केल्या आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी होत असते. नोंदणी व मुद्रणशुल्क विभागाच्या या आदेशात नेमक्या कोणत्या तीन सूचना जारी केल्या आहेत याचा आढावा घेऊया..

सूचना क्र. १ – एखाद्या सर्व्हे नंबरचे म्हणजेच गट नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नम्बरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणारा असाल, तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही. म्हणजेच सदर जमीन तुम्ही विकत घ्याल पण ती जमीन तुमच्या नावे होणार नाही. मात्र त्याच सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यामध्ये एक, दोन गुंठ्यांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले-आऊट मधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.

सूचना क्र. २ – यापूर्वीच एखाद्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी केली असेल, अशा तुकड्याच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठीसुद्धा सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. वरील सूचना समजून घेण्याकरता प्रथम प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊया. आपल्या इथे शेतजमिनीचे सर्वसाधारण तीन प्रकार पडतात, वरकस जमीन, कोरडवाहू जमीन आणि बागायत जमीन. जमिनीच्या या प्रकारानुसार तुकडेबंदी, तुकडेजोड व एकत्रीकरण कायदान्वये प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेली जमीन म्हणजे तुकडा होय.

या प्रमाणभूत क्षेत्राविषयी अधिक माहिती परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय यांनी लिहिलेल्या शेतजमिनीची खरेदी या लेखात दिली आहे. या लेखात म्हटले आहे की जर तुमच्याकडे वरकस जमीन असेल म्हणजेच भात शेताच्या लागवडीसाठी, राबखताच्या प्रयोजनार्थ आणली जाणारी जमीन असेल तर या शेतजमिनीसाठी तुकडेबंदी, तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा १९४७ अन्वये प्रमाणभूत क्षेत्र २० गुंठे ठरवण्यात आलं आहे.

दुसरी आहे कोरडवाहू जमीन या जमिनीवरील शेती ही पावसाच्या पाण्यावर होते. या जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र १५ गुंठे ठरवण्यात आलं आहे. कॅनॉल, मोट, पाट याने शेतीसाठी पाणीपुरवठा होतं असलेली जमीन म्हणजे बागायत जमीन. तुकडेबंदी – तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा १९४७ अन्वये विहिर बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र २० गुंठे ठरवण्यात आले आहे. तर कॅनॉल (पाट) बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र १० गुंठे निश्चित करण्यात आलं आहे.
महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे प्रमाणभूत क्षेत्राची जी मर्यादा आहे ती वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळी आहे. त्यामुळे जर का तुम्ही शेतजमिनीची खरेदी किंवा विक्री करणार असाल तर तुमच्या भागातील प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा काय आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

सूचना क्र. ३ – एखादा अलाहिदा (वेगळा किंवा स्वतंत्र) निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागातर्फे हद्दी निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चित मोजणी नकाशा देण्यात आला असेल तर अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही पण, जर अशा तुकड्याचं विभाजन करणार असाल तर मात्र त्याला वरील अटी वं शर्ती लागू राहतील.

त्यामुळे जर शेतजमिनीची खरेदी-विक्री तुम्ही करणार असाल तर वरील प्रक्रिया लक्षात ठेवूनच करा, जेणेकरून कायदेशीर मार्गाने ती प्रक्रिया होईल व तुमची फसवणूक देखील होणार नाही.

Exit mobile version