नवी दिल्ली | मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘लेबरब्युरो’ कडून देशातील प्रत्येक क्षेत्राशी निगडीत व्यक्तींची गणना करण्यात येईल. देशात पहिल्यांदा ‘श्रमगणना’ करण्यात येणार आहे. श्रम मंत्रालयाकडून याची तयारी केली जात आहे. देशात किती डॉक्टर, अभियंते, वकील, सीए, मजूर, माळी, स्वयंपाकी, चालक आहेत यासंबंधीची आकडेवारी एकत्रित करण्यात येणार आहे. जानेवारी-२०२१ पासून सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात येईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या ही गणना सहा महिने तसेच भविष्यात दर तीन महिन्यांनी केली जाईल. वैज्ञानिक सर्वेक्षणाचा आधार त्याकरीता घेण्यात येईल सर्वेक्षणासंबंधीच्या पद्धती संबंधी येत्या १५ दिवसांत स्पष्ट धोरण निश्चित केले जाणार आहे. जिल्हापातळीवरील कंपन्या, कार्यालये, रुग्णालये, रहिवासी कल्याण संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे आकडेवारी सर्वेक्षणातून एकत्रित केली जाईल. जिल्हा, राज्य तसेच केंद्रस्तरावर ही गणना केली जाणार असून सर्वेक्षण करणाऱ्या टीमचे प्रशिक्षण येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. कामगार, मजूर, व्यावसायिकांची माहिती राज्यांकडून दिली जात नाही अथवा माहिती पूरवण्यात विलंब केला जातो. त्यामुळे श्रमगणना आवश्यक आहे. कायद्यात बदल करून लेबर ब्युरोला त्यामुळे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.