क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावरील लेख!
संपादकीय | प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते ३ ऑगस्ट १९०० मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव) खेड्यात जन्मले. ते तेथेच व्हर्नाक्युलर फायनल ही त्या काळी असणारी मराठी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले. त्यांनी नोकरी सांभाळत गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या.
ते आपले भाषण रोजच्या व्यवहारातील दाखले, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली, विनोदाची पेरणी यांच्या आधारावर प्रभावी करत. त्यामुळे ते साहजिकच लोकप्रिय वक्ते झाले. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्याचवेळी (१९३० मध्ये) महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या असहकाराच्या चळवळीने त्यांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. त्यांनी असहकाराच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस कमिटीमध्येही कार्यकर्ते म्हणून त्यांची निवड केली गेली.
‘छोड़ो भारत’ या कॉंग्रेसच्या घोषणेनंतर देशभर उठाव झाला. इतर कालखंडांतील चळवळीपेक्षा अगदी वेगळ्या लढ्याचा, तंत्राचा, पुढारीपणाचा आणि विचारांचा आविष्कार त्यावेळी झाला होता. त्याच क्रांतिकारक आविष्काराचे नवीन प्रतीक म्हणजे – पत्रीसरकार!
ते समांतर सरकार सातारा, सांगली, वाळवा या भागात शेतकरी गढ्यांमध्ये उभे राहिले (तशाच प्रकारचा पण जरासा निराळा प्रकार बंगालच्या मिदनापूर भागात उभा झाला होता.) त्याचे प्रतीक होते नाना पाटील. म्हणून ते ‘क्रांतिसिंह’ नाना पाटील असे ख्यातनाम झाले.
स्वातंत्र्यचळवळीच्या नवीन प्रकाराची व प्रतीकाची अशी काही अपूर्व चिन्हे होती, की त्याने महाराष्ट्र मनाची चांगलीच पकड घेतली होती. पहिले म्हणजे सत्याग्रह, अहिंसा वगैरेंची गांधीवादी बंधने पत्री सरकारने गुंडाळून बाजूला ठेवली होती. दुसरे, त्यांनी स्वत:ला ‘सरकार’ म्हणून जाहीर केले आणि ‘मावळ’ प्रांतातील गढ्यांतून ब्रिटिश राजवट संपली असा अंमल बसवला. तिसरे, स्वत:ला ‘सरकार’ म्हणून घोषित केल्यावर आपली स्वतंत्र अशी हत्यारी सेना असावी लागते, म्हणून पत्रीसरकारने अशी ‘हत्यारबंदी’ उभी केली. भाले-बरच्या, लाठी-काठीपासून ते बंदुकीपर्यंत. चौथे, ‘सरकार’ चालवायला पैसा लागतो. त्यासाठी इंग्रजांचे खजिने लुटले (उदाहरणार्थ, धुळ्याचा दरोडा) आणि पाचवे म्हणजे या ‘सरकार’चा मुख्य पाया शेतकरी हा झाला होता. त्यामुळे शेतकरी विमोचनाचे काही प्रश्न ताबडतोब सोडवण्यात आले. सावकारी व मोठ्या जमीनधारकांची गुंडगिरी नष्ट केली गेली होती. त्यांना साहाय्य करणार्यान गावगुंडांचा नि:पात केला गेला होता. त्यांना शिक्षा देण्यात आल्या होत्या. शिक्षेचा एक प्रकार ‘पत्री मारणे’ हा होता. अनेकांना गोळ्या घालून देहदंडही करावा लागला होता. त्यामुळेच या ‘सरकार-सत्ते’ला खरा लढाऊ, विश्वासू ‘मास बेस’ लाभला होता. तेथूनच नानांना ‘क्रांतिसिंह’ हे बिरुद्ध चिकटले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्यांच्या घरादाराकडे पाठ फिरवली ती १९३० साली, तीही कायमची. त्यांची पत्नी तारुण्यात निधन पावली. त्यांनी पुन्हा लग्न न करता देशाचा संसार हा आपला संसार मानला. नाना पाटील १९४२ च्या क्रांतीपू्र्वी एकूण आठ वेळा तुरुंगात गेले होते. पण १९४२ च्या ८ ऑगस्टच्या ‘करेंगे या मरेंगे’ या महात्मा गांधीजींच्या आदेशानंतर नाना पाटील व त्यांच्या सहकार्यां नी ‘आता पोलिसांच्या ताब्यात जायचे नाही’ असे ठरवले. महात्मा गांधी यांनीच ‘करेंगे या मरेंगे’ या आदेशानंतर सांगितले होते, की जर राष्ट्रीय नेते तुरुंगात गेले तर प्रत्येक भारतीयाने स्वत:स स्वतंत्र समजून आपल्या स्वत:च्या बुद्धीला पटेल त्यानुसार इंग्रजांना घालवून देण्याची चळवळ उभारावी. त्याप्रमाणे नाना पाटील यांनी १९४४ मध्ये त्यांची व महात्मा गांधींची पाचगणीस भेट झाली तेव्हा त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, साताऱ्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.’
नाना पाटील यांच्या या ‘प्रतिसरकार’चे लष्करी व पोलिसी अंग म्हणजे ‘तुफान सेना’ हे होते. जर्मनीच्या हिटलरची ‘storm troopers’ व नेताजी सुभाषचंद्र यांची ‘आझाद हिंद सेना’ हे लष्करी संघटनांचे आदर्श समोर ठेवून नाना पाटील व त्यांचे सहकारी जी.डी. लाड, अप्पासाहेब लाड, नागनाथ नायकवडी, राजुताई पाटील इत्यादींनी ‘तुफान सेने’ची निर्मिती (१९४३-४४) केली. जी.डी. लाड हे ‘तुफान सेने’चे फिल्ड मार्शल होते. ‘तुफान सेने’च्या सैनिकांपुढे त्या काळच्या अनेक नामवंतांची व्याख्याने व बौद्धिके होत असत. अच्युतराव पटवर्धन व साने गुरुजी यांचेही मार्गदर्शन ‘तुफान सैनिकां’ना झालेले आहे अशी आठवण भाई भगवानराव पाटील यांनी सांगितली आहे.
नाना पाटील भूमिगत अवस्थेत ज्या ज्या मंडळींकडे आश्रयाला असत तेव्हा ते त्यांना सांगत, की ‘माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर मला लगेच पुरून टाका. फक्त सुरेशबाबूंस सांगा. (म्हणजे नाथाजी लाड. ते क्रांतिसिंहांचे चिटणीस होते. तसेच १९४२ च्या लढ्यातील भूमिगत नेतेही होते. त्यांचे भूमिगत अवस्थेतले टोपणनाव) चळवळीतील इतर कोणासही ते कळता कामा नये. चळवळ जिंवत राहिली पाहिजे.’
मुंबईचे प्रख्यात असे बंड म्हणजे आपल्या आरमाराचे. नाविकांच्या संपाचे, फेब्रुवारी १९४६ मधील; त्या दिवशी मुंबईच्या कम्युनिस्ट पक्षाने सार्वत्रिक संपाची हाक दिली. त्या वेळेस मुंबईतही क्रांतिसिंह यांच्या ‘पत्रीसरकारची’ झाक येऊन गेल्याची आठवण कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सांगितलेली आहे. ‘पत्रीसरकार’च्याच विरुद्ध कॉंग्रेस सत्तेने संपूर्ण सत्तांतर व्हायच्या अगोदरच पत्री मारून हुकूम काढला, की हत्यारे ताबडतोब सरकारजवळ द्या, नाहीतर सरकारी फौज पाठवू. एवढ्यावरच न थांबता काहींना बेरड, दरोडेखोर, खूनी ठरवून फाशी देण्यात आले. असे डांगे यांनी १२ डिसेंबर १९७६ च्या साप्ताहिक ‘युगांतर’मध्ये लिहिले आहे. पुढे, नाना पाटील व त्यांच्या मित्रांनी ‘शेतकरी कामगार पक्षाचे’ स्वरूप घेतले. नंतर ते कम्युनिस्ट पक्षातही दाखल झाले.
क्रांतिसिंह नाना पाटील बीड जिल्ह्यात १९६७ मध्ये खासदार झाले होते. सातारा येथील किरण माने यांनी सांगितले, की “१९६७ ला अण्णांना (क्रांतिसिंह नाना पाटील)सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी भरायची होती, पण त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना बीड मतदारसंघातून उभे राहण्याचा आदेश दिला. नाना पाटील बीडला निवडणूक लढवायला निघाले, तेव्हा त्यांच्याजवळ एसटीच्या तिकिटाला पैसे नव्हते! माझे वडील (संपत मोरे यांचे) कॉम्रेड नारायण माने यांनी त्यांचे तिकिट काढले होते. ते त्यांच्या सोबत होते.
बीडला गेल्यावर तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. नानांनी स्वत:च्या आर्थिक अडचणीबाबत त्यांना सांगितले, तेव्हा तेथील लोकांनी वर्गणी काढून त्यांची अनामत रक्कम भरली. बाहेरून आलेल्या, पण हैदराबाद मुक्ती संग्रामात मोलाची कामगिरी बजावलेल्या नाना पाटील यांना रात्रीचा दिवस करून निवडून आणले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नाना पाटील तिथल्या जनतेला म्हणाले, ‘मी आता पाच वर्षं गावाकडं जाणार नाही, तुमच्यासोबतच राहणार!’ त्यांनी लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पाटोदा येथील ग्रामपंचायतीत मुक्काम ठोकला. तेथून ते लोकांचे प्रश्न सोडवू लागले. एक पत्र्याची पेटी, त्यात आईचा फोटो, दोन अंगरखे, दोन धोतरे आणि पांघरायला एक घोंगडे, एवढेच साहित्य त्या वेळी त्यांच्यासोबत होते. पाटोदा या गावातील त्यांचे सहकारी त्यांना दोन वेळचे जेवण देत. जेवण म्हणजे काय, तर दोन वेळच्या जेवणासाठी पाच भाकरी, त्यासोबत भाजी किंवा चटणी मिळाली तर त्यांना चालायची. एवढ्या जेवणावर ते खूश असायचे. त्यांच्या पाटोदा मुक्कामातील आठवणी इकबाल पेंटर यांनी व्यवस्थित नोंदवून ठेवल्या आहेत.
होळ येथील विश्वनाथ शिंदे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी, त्यांनीही एक प्रसंग सांगितला. खासदार नाना पाटील सायंकाळी सातच्या सुमारास होळला आले. शिंदे यांना भेटून म्हणाले, ‘मी आज राहणार हाय.’ “मग घरी चला की अण्णा.” “न्हाय मी देवळात राहतू. मला दोन-तीन भाकरी आणि कायतरी कोरड्यास आणून दे. गावातल्या समद्या लोकांना सांग मी आलुय म्हणून”.त्या दिवशी त्या गावातील महादेवाच्या मंदिरात त्यांची सभा झाली. लोक त्यांना घरी या, म्हणून आग्रह करत होते; पण त्यांनी रात्री देवळातच मुक्काम केला आणि ते सकाळी लवकर उठून निघून गेले. विशेष म्हणजे, ते होळला सायकलवरून आले होते!
नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील यांनी सांगितले, ‘मी पाचवीला ताकारीच्या शाळेत शिकत होतो. अण्णा तेव्हा खासदार होते. त्यांची देवराष्ट्र गावात सभा होती. ते त्या सभेसाठी मुंबईवरून रेल्वेने ताकारीपर्यंत आले होते. मग ते मला भेटायला शाळेत आले. ते मला घेऊन निघाले. त्यांना न्यायला देवराष्ट्र गावातील कार्यकर्ते बैलगाडी घेऊन आलेले. मी त्यांच्यासोबत बैलगाडीने प्रवास केला. तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आहे. माझ्या आजोबांनी शेकडो मैल प्रवास केला. कधी ते पायी जात, कधी सायकल, तर अनेकदा बैलगाडी. ते दूरच्या गावाचा प्रवास एसटीने करत. ते खासदार झाले, तरी त्यांनी जीपगाडी घेतली नव्हती. मी त्यांच्यासोबत सायकलीवरून डब्बलशीट फिरलो आहे. मी त्यांचा लाडका होतो. ते मला सायकलीवर बसवून घेऊन जायचे. नाना पाटील १९५७ ला सातारा येथून आणि १९६७ ला बीड येथून असे दोन वेळा खासदार झाले. त्यांच्या साधेपणाच्या कथा ऐकून कोणीही थक्क होईल!
कवी सुरेश मोहिते हे सुद्धा नानांच्या आठवणी सांगतात: “एकदा अण्णा आमच्या गावात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना सोडायला आमची बैलगाडी गेली होती. अण्णांना आमची कौतुक आणि निशाण ही बैलजोडी खूपच आवडली. पुन्हा ते कधीही भेटले, तर कौतुक-निशाणची चौकशी करायचे.
अण्णा त्यांच्या मुलीच्या सासरी हनमंतवडवे या गावाला एसटीने येत होते. त्यांच्या सोबत त्यांची कायम सोबत करणारी पत्र्याची पेटी होती. हनमंतवडवेला आल्यावर पेटी घेऊन उतरताना अण्णांना थोडा उशीर झाला, म्हणून एसटीचा वाहक त्यांच्यावर खेकसला, “म्हाताऱ्या, गाव जवळ आल्यावर पुढे यायला येत न्हाय का?” त्या तरुण वाहकाने त्यांना ओळखले नव्हते. इंग्रजी सत्तेच्या उरात धडकी बसणारा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत आपल्या अमोघ आणि गावरान वक्तृत्वाने राज्यातील जनतेला लढाईला सज्ज करणारा, माजी खासदार असलेला हा लोकनेता त्या वाहकाला काहीही बोलला नाही. त्याने फक्त स्मित केले. सुभाष पाटील यांनी सांगितलेला हा प्रसंग. स्वत:च्या मानापमानाची पर्वा न करणारे नाना लोकांच्या प्रश्नावर मात्र रान उठवायचे. आक्रमक व्हायचे. त्यांची भाषणशैली संवादशास्त्राच्या अभ्यासकांना खुणावत असते. लोकांचे प्रश्न मांडताना राज्यकर्त्यांवर टीकेच्या तोफा डागणारे नाना व्यक्तिगत जीवनात हळवे आणि मायाळू होते.
त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्त्व केले. दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहाला मदत केली. नाना पाटील सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा चळवळींमध्ये अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांचे निधन मिरज येथे ६ डिसेंबर १९७६ रोजी झाले.
क्रांतिसिंह नाना पाटील (खंड एक व दोन) संपादक : जयसिंगराव भाऊसाहेब पवार, रिया पब्लिकेशन, कोल्हापूर आणि महाराष्ट्र वार्षिकी २०११.
(संपत मोरे यांच्या ‘युगांतर’मधील काही भाग उद्धृत)
संकलन : राजेंद्र शिंदे.