Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पवारांप्रमाणे ‘पावसाळे’ पाहिलेला अमेरिकेचा योद्धा, महाराष्ट्राप्रमाणे अमेरिकेत परिवर्तन घडेल; जो बायडेन!

Spread the love

मुंबई | अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या फ्लोरिडामधील पावसातील सभेची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. फ्लोरिडात जो बायडेन यांचे भाषण सुरु असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. ‘वादळ संपेल आणि नव्या दिवसांची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहिली आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यानंतर जो बायडेन यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

जो बायडेन यांच्या पावसातील सभेच्या फोटोची महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेकजण या फोटोची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेशी करत आहेत. जो बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कडवं आव्हान उभं केलं आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जो बायडेन यांचा फोटो ट्विटरवर अपलोड करुन महाराष्ट्राने २०१९ ला जे पाहिलं तेच अमेरिकेतही पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला. जेंव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेंव्हा तो पाऊस, जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे! असे रोहित पवार याने म्हटले आहे.

Exit mobile version