चेन्नई | विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Match 1. It's all over! Royal Challengers Bangalore won by 2 wickets https://t.co/PiSqZia9an #MIvRCB #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2021
शेवटच्या चेंडूवर विजयी धाव
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुने मुंबईवर निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्स धावबाद झाल्याने सामना आरसीबीच्या हातून निसटेल असं वाटत होतं. परंतु गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलने शेवटची धाव घेत सामना जिंकण्यात मोलाची भूमिका निभावली.
दुसऱ्या बाजूला प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या पलटणचा बंगळुरुचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने ‘पंच’नामा केला. हर्षलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 27 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे 5 पैकी 3 विकेट्स त्याने सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये घेतल्या. हर्षल आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कारना सन्मानित करण्यात आले.