इंदापूर | कोरोनाचा समूहसंसर्ग व मृत्यूदर रोखण्यासाठी येत्या शुक्रवार दि.११ तारखेपासून इंदापूर शहरात आठवडाभर जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी झुम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज दिली. तत्पूर्वी कोरोनावर नियंत्रण आणण्यासंदर्भात आराखडा करण्यासाठी संदर्भात गुरुवारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षा, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्थांचे चालक, व्यापारी, बँकाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदिंची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे,अशी माहिती ही त्यांनी दिली. गारटकर म्हणाले की, कोरोनावर जोपर्यंत ठोस औषध वा लस निघत नाही, तोपर्यंत सर्वांनी स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. राजकारण बाजूस ठेवून आपली माणसं वाचविण्यास प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, निमगाव केतकी, भिगवण येथे सुसज्ज कोविड सेंटर्स उभा केली आहेत.
इंदापूर रोटरी क्लबने ऑक्सिजनयुक्त शंभर बेड देण्याचे मान्य केले आहे,अशी माहिती गारटकर यांनी दिली. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. युवावर्ग व कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तिंनी रक्तदान करण्यास पुढे येणे गरजेचे आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून आपण सर्वांनी इंजेक्शन, औषधे उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. सर्व कोविड सेंटर्समध्ये रुग्णांना गरम पाणी, वाफ घेण्याची सोय, जनरेटर व सुसज्ज रुग्णवाहिकेची सुविधा देणे, चहा,डबा अथवा औषधे पोहोचवण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.