निमगाव केतकी | इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ग्रामपंचायतीमधील सलग 10 वर्षे असलेली भाजपच्या जाधव गटाची सत्ता उलथून टाकत दशरथ डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता घेत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला. 17 पैकी 12 जागेवर राष्ट्रवादीचे, तर 5 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालाकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले होते.
सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त मतदान असलेल्या विधानसभा निवडणुकीत तीनही वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना लीड देणाऱ्या निमगाव केतकी गावाने या वेळी मात्र ग्रामपंचायतीची सत्ताही भरणे गटाच्या ताब्यात दिली आहे. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत मात्र गावाने हर्षवर्धन पाटील यांच्या जाधव गटाकडे ग्रामपंचायत दिली होती. या वेळी मात्र, विधानसभेबरोबरच ग्रामपंचायतीला निमगावकरांनी भरणे गटाला कौल दिला आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती देवराज जाधव व माजी सभापती अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजप पुरस्कृत केतकेश्वर पॅनेलचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली व माजी सभापती दत्तात्रेय शेंडे, सुवर्णयुग ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, संदीप सोपानराव या प्रचार प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत सुवर्णयुग पॅनेलने धुव्वा उडवला.
जाधव व डोंगरे या दोन्ही पॅनेल प्रमुखांची मुले एकमेकांविरोधात उभी होती. यात प्रथमच रिंगणात उतरलेल्या प्रवीण दशरथ डोंगरे यांनी विद्यमान उपसरपंच तुषार देवराज जाधव यांचा पराभव केला, तर जाधव गट सोडून प्रथम राष्ट्रवादीच्या बाजूने उतरलेल्या सचिन दत्तात्रेय चांदणे यांना 1045 एवढी मते मिळाल्याने त्यांचा उच्चांकी 622 मताधिक्याने विजय झाला.
राष्ट्रवादी पुरस्कृत सुवर्णयुग पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
प्रभाग 1- प्रवीण दशरथ डोंगरे, अजित भिवा मिसाळ, अनुराधा संतोष जगताप. प्रभाग 2- सचिन दत्तात्रेय चांदणे, मीना दीपक भोंग. प्रभाग 3
– तात्यासाहेब बापुराव वडापुरे. प्रभाग 5- मनीषा सुरेश बारवकर, अलका माणिक भोंग, मधुकर हरिबा भोसले. प्रभाग 6- सायली सागर
मिसाळ, अमोल पोपट हेगडे, कमल शंकर राऊत.
भाजप पुरस्कृत केतकेश्वर पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
प्रभाग 2- दादाराम विठ्ठल शेंडे. प्रभाग 3- रिना सुभाष भोंग. प्रभाग 4- सचिन अंकुश जाधव, लता हनुमंत राऊत, अर्चना अनिल भोंग.