इंदापूर | इंदापुरचे भाजचे नेते माजी मंत्री तथा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सुन होणार आहे. सध्या ठाकरे आणि पाटील कुटूंबातील सदस्य लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवासोबत अंकिता पाटील यांचा विवाह होणार आहे.
स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र स्व बिंदुमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा येत्या 28 डिसेंबर रोजी मुंबईत विवाह होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती. आज यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेऊन विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले.
कोण आहेत निहार ठाकरे ?
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचे निहार ठाकरे हे सुपुत्र आहेत. निहार ठाकरे यांच्या वडिलांचे 1996 साली एका अपघातात निधन झालं होतं. निहार ठाकरे हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी परदेशातून शिक्षण एलएलएमपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत.
कोण आहेत अंकिता पाटील?
अंकिता पाटील ह्या राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. सध्या त्या राजकारणात सक्रीय आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्या काम करत आहेत. वडिल भाजपात जरी असले तरी त्या अजून काँग्रेस पक्षाच्या बावडा लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
28 रोजी मुंबईत पार पडणार विवाह सोहळा
अंकिता पाटील व निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा 28 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा होणार आहे. तत्पूर्वी बावडा या गावी 17 डिसेंबर रोजी भोजन सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
परदेशात ओळख झाली…
अंकिता पाटील व निहार ठाकरे हे दोघे परदेशात शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी संमती दिली.आता अंकिता पाटील ह्या 28 डिसेंबर रोजी ठाकरे घराण्याच्या सुन होणार आहेत.