सोलापूर | ‘ग्लोबल टीचर प्राईज’ प्राप्त बार्शीतील रणजितसिंह डिसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा आज सत्कार केला. रणजित डिसले यांची विधान परिषदेच्या जागेसाठी शिफारस करू, असे प्रवीण दरेकर म्हणाले. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागा भरायच्या आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील फोनद्वारे डिसले गुरुजींचे अभिनंदन केले. राज्याच्या विधिमंडळामध्ये डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहितीदेखील प्रवीण दरेकर यांनी दिली. दरेकर म्हणाले की, राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाल्या. यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो हेच देशाचे दुर्दैव आहे.
रणजित डिसले यांची विधान परिषदेच्या १२ जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून शिफारशीचे पत्र देऊ असे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले आहे; यामुळे नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरिता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.