विरुद्धाहार म्हणजे कोणत्या दोन गोष्टी एकत्र खाल्ला की आरोग्याला अहितकर असतात असे अनेक वेळा सांगितले जाते. पण कोणत्या गोष्टी एकत्र घ्याव्या जेणेकरून पदार्थ पचण्यास मदत होईल. पदार्थाचे अजीर्ण होणार नाही. असा देखील संयोग आहारात करणे आवश्यक असते. काही अशाच एकमेकांना पचविणाऱ्या पदार्थांविषयी माहिती या लेखात घेऊया – दही – दही आंबट पचायला वेळ लागणारे असते. आपला एक गैरसमज आहे की दही थंड असते पण असे नाही. दही उष्ण आहे. रात्री दही खाऊ नये. रोज दही खाऊ नये.
दही कशासोबत खाल्ले की त्रास होत नाही तर साखर, मूगाचे वडे किंवा मूगाची दाळ, तूप, आवळा, मध या पदार्थासह दही असल्यास त्रास होत नाही. यावरून लक्षात आले असेल आपण जे पंचामृत बनवितो ते इतके गुणात्मक व त्याचा त्रास का होत नाही. मध तूप साखर दही एकत्र असल्यामुळे ते एकमेकांना पूरक आहेत.
- श्रीखंड – दह्यापासून तयार केलेले श्रीखंड बल वाढविणारे रुचि उत्पन्न करणारे स्निग्ध असते. यात रंग व शाही बनविण्याच्या नादात भरपूर काजू बदाम घालणे चुकीचे आहे. श्रीखंड पचायला जड असल्यामुळे सुंठ, काळेमिरे, पिंपळी, जावित्री, केसर, इलायची असे पाचन करणारी उष्ण सुगंधी द्रव्ये श्रीखंडात थोडी घालावी.
- उसाचा रस – यात किंचीत आलेरस टाकल्यास रसाचे अजीर्ण होत नाही.
- पालेभाज्या, कडधान्य द्विदल धान्य खाल्यानंतर ताक किंवा दह्याचे वरचे पाणी ( दह्याची निवळी ) प्यावे.
- उपवास, व्यायाम यामुळे येणाऱ्या थकवा दूर करण्याकरीता दूध घ्यावे.
- गव्हाचे पदार्थ, तिखट मसालेदार पदार्थ खाल्यानंतर थंड पाणी प्यावे. ( फ्रीजमधील नव्हे )
- केळी खाल्यानंतर विलायची खावी.
- उडदाचे पदार्थ दही, ताक यासोबत खावे.
- आंब्याचा रसासह दूध किंवा तूप टाकून घ्यावे.
असे हे विविध पदार्थाचा संयोग केल्यास एका पदार्थाचे अजीर्ण होत नाही. पाचन होण्यास मदत होते.