Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

जाणून घ्या कोणत्या महापुरुषांची जयंती यंदा शासन करणार साजरी!

Spread the love

प्रत्येक वर्षी कोणकोणते राष्ट्रपुरुष आणि मान्यवर व्यक्तींची जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी आणि कुठल्या दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग काढत असतो. दोन दिवसांपूर्वी काढलेल्या या परिपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही तारखेनुसारच म्हणजे १९ फेब्रुवारीला साजरी करावी असे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेना  दरवर्षी तारखेनुसार नव्हे तर तिथीनुसार शिवरायांची जयंती साजरी करीत असते. त्या निमित्त राज्यभर पक्षातर्फे अनेक कार्यक्रमदेखील होतात पण उद्धव ठाकरे यांनी सरकारी पातळीवर शिवरायांची जयंती तारखेनुसार साजरी करण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. औरंगाबादचे  संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करावे अशी शिवसेनेची जुनी मागणी आहे आणि सध्या त्यावरून वादळ उठले आहे. मात्र, शिवरायांची जयंती साजरी तिथीनुसारच शासकीय पातळीवरदेखील साजरी करावी असा आग्रह शिवसेनेने धरलेला नाही.

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारीला तर ा्रबोधनकार ठाकरे  यांची जयंती १७ सप्टेंबरला असते. या दोन्ही मान्यवरांच्या जयंतीला प्रत्येक शासकीय कार्यालयात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावे असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.  २३ मार्चला शहीद दिन, २१ मे रोजी दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस, २० आॅगस्ट सद्भावना दिवस, ३१ आॅक्टोबरला इंदिरा गांधी  पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस, २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करावा असे परिपत्रकात म्हटले आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे, संत सेवालाल महाराज, बाळशास्री जांभेकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, संत रविदास महाराज, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा बसवेश्वर, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रतापसिंह, राजर्षी शाहू महाराज, वसंतराव नाईक, लोकमान्य टिळक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, राजे उमाजी नाईक, प्रबोधनकार ठाकरे, पंडित दीनदयाळ उपाध्याय, महात्मा गांधी, लालबहादूर शास्री, डॉ.एपीजे अब्दुल कलाम, महर्षी वाल्मिकी, इंदिरा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, बिरसा मुंडा, संत जगनाडे महाराज, डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या राष्ट्रपुरुष/थोरव्यक्तींची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात येणार आहे. नावांचा हा क्रम जयंतीच्या तारखांनुसार आहे. या जयंतीदिनी कोणकोणते कार्यक्रम घ्यावेत हेदेखील परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version