Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोल्हापूर व सातारा गादीची स्थापना : खा. संभाजीराजेंनी सांगितल्या आठवणी!

Spread the love

कोल्हापूर | वारणेचा तह झाल्यानंतर कोल्हापूर व सातारा गादीची स्थापना झाली, याबाबतच्या आठवणी खा. संभाजीराजे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितल्या. खा. संभाजीराजे यांनी फेस बुक वर लिहले आहे की,

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य व छत्रपतींची गादी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे लढविली. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी अत्यंत पराक्रमाने स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवले व स्वराज्याचा दक्षिणेस विस्तारही केला. मात्र २ मार्च १७०० रोजी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी काळाने राजाराम महाराजांवरही घाला घातला. छत्रपती राजाराम महाराजांनंतर छत्रपतींच्या घराण्यात असणाऱ्या तीन पुरुषांपैकी वडील वारस शंभूपुत्र शाहूराजे मुघलांच्या कैदेत होते तर राजारामपुत्र शिवाजीराजे व संभाजीराजे हे अज्ञान होते. अशा परिस्थितीत राज्य लढवायचे तर राज्याला राजा हवाच या न्याय्य हेतूने शिवस्नुषा ताराराणी साहेबांनी आपले पुत्र शिवाजी महाराज यांना सिंहासनारुढ करुन युद्धाची सूत्रे हाती घेतली. औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र जिंकायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराणी ताराबाई साहेबांनी याच महाराष्ट्रात बांधले. २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला व मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.

मात्र हार पत्करतील ते मुघल कसले ! औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने मराठ्यांमध्ये दुफळी माजावी या हेतूने दि. १ मे १७०७ रोजी शंभुपुत्र शाहू महाराजांना कैदमुक्त केले. यावेळी कित्येक बडे सरदार शाहूराजांना सामिल झाले. सन १७०८ साली शाहू महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेऊन साताऱ्यास राजधानी घोषित केली. पुढे १७१० साली पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करुन करवीर राज्याची स्थापना केल्याचे ताराराणींनी जाहीर केले. यामुळे स्वराज्याचे विभाजन होऊन छत्रपतींची करवीर (कोल्हापूर) व सातारा गादी अस्तित्वात आली. पुढे छत्रपती राजाराम महाराजांचे धाकटे पुत्र संभाजी महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. करवीर व सातारा राज्यामध्ये वर्चस्वासाठी छोट्यामोठ्या लढाया होत होत्या. मात्र १७३० साली वारणेकाठी निर्णायक युद्ध झाले. यामध्ये दोन्ही छत्रपतींना आपल्या ताकदीचा अंदाज आला. ऐकमेकांशी लढाई करणे गैर असल्याने दोन्ही बाजूच्या प्रमुख व्यक्तींनी वाटाघाटी केल्या व तह करण्याचे निश्चित झाले.

तह व आपले बंधू छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीकरीता पन्हाळगडहून संभाजी महाराजांनी साताऱ्यास प्रयाण केले तर साताऱ्याहून शाहू महाराज संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी जाखिणवाडी येथे आले. छत्रपती राजबंधूंच्या भेटीच्या दिवशी जाखिणवाडी व वाठार पर्यंत दोन लाख लोक उपस्थित होते. दि.२७ फेब्रुवारी १७३१ रोजी संभाजी महाराज व शाहू महाराजांची भेट झाली. तोफांची सरबत्ती झाली. शाहू महाराजांसोबत संभाजी महाराज साताऱ्यास आले. अदालत राजवाड्यामध्ये महाराजांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन महिन्यांच्या मुक्कामात छत्रपती संभाजी महाराजांना अनेक सरदारांनी शाही मेजवान्या व नजराणे अर्पण केले. शाहू महाराजांनी शेकडो जातीवंत घोडे, हत्ती, जडावांचा खंजीर, पोषाख व रोख दोन लाख रुपये महाराजांना भेट दिले.

शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्यामध्ये दि.१३ एप्रिल १७३१ रोजी सातारा येथे तह झाला. या तहान्वये वारणा नदी हि दोन्ही राज्यांची सीमा ठरवली गेली. त्यामुळे हा तह “वारणेचा तह” म्हणून ओळखला जातो. एकूण ९ कलमांच्या या तहामधील ५ वे कलम खूप काही सांगून जाते, “तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी”. अशाप्रकारे स्वराज्याच्या करवीर (कोल्हापूर) व सातारा अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.

Exit mobile version