कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळीचा दुसरा दिवस पाडवा. या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही पुण्याईमुळे श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली. असुर असून सुद्धा भगवंताचा शरणी गेला म्हणून देवाने त्याचे उद्धार केले. या दिवशी विक्रम सवस्तर या कालगणनेच्या नव वर्षाचा प्रारंभ होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं, त्यांचा पाडाव केला, त्या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमदित्यानं विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली.
हा दिवस साजरा करण्याची पद्धत
वर्षांतील साडेतीन मुहूर्तापैकी हा दिवस अर्ध्या मुहूर्ताचा समजला जातो म्हणून नव्या उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ असल्याचे मानले आहे.
या दिवशी गोवर्धनाची पूजा करतात. काही लोकं शेणाचा पर्वत करून, श्रीकृष्ण, इंद्र, गायी- वासरे यांची चित्रे मांडून त्यांची पूजा करतात. गवळी आपल्या गायींना सजवून मिरवतात.
प्रतिपदा नर्ववर्षाची सुरुवात मानून व्यापारी वही पूजन करतात.
मुली- स्त्रिया तेल- उटणे लावून आपल्या वडिलांना आणि पतीला स्नान करवतात. नंतर त्यांना ओवाळतात.
दिवाळी पाडवा
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. पती-पत्नीमधील स्नेह आणखी दृढ व्हावा म्हणून हा दिवस साजरा केला जाली. यंदा 5 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे.
शुभ मुहूर्त-
सकाळी 6 वाजून 50 मिनिटं ते 10 वाजून 50 मिनिटांपर्यंत.
दुपारी 12 वाजून 25 मिनिटं ते 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत.
या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. शेतकरी लोक सकाळीच शेतात जाऊन मडक्यात कणकेचा पेटलेला दिवा नेऊन शेताच्या बांधावर जाऊन मडके पुरून देतात आणि बळी राजाची पूजा करतात. या दिवशी सकाळी माहेरच्या आणि सासरच्या पुरुषांना तेल लावण्याची पद्धत आहे. या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना आणि नवऱ्याला पाटावर बसवून त्यांच्या भोवती रांगोळी काढून औक्षण करतात. आपल्या वैवाहिक संसार उज्ज्वलं व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहो या साठी पत्नी पतीचे औक्षण करते. नवरा देखील बायकोला ओवाळणी देतो.
या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी नव विवाहित जोडप्यानंकडे पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळसण करतात आणि जावयाचा मान म्हणून त्याला आहेर देण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. विशेष करून उत्तर भारतात याचा महत्त्व आहे या दिवशी विष्णूंची पूजा केली जाते त्यांना पंच पक्वान्नांचा नैवेद्य दिला जातो. या सणाला अन्नकुट असे ही म्हणतात.
व्यापारी वर्ग या दिवशी आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या काढल्या जातात. नवीन वह्यांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करतात.
या दिवशी विक्रमी संवत सुरू होतं. या दिवसाला द्यूत प्रतिपदा देखील म्हणतात त्या मागील कारण असे की एका पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला द्यूत खेळात हरवले होते. ‘इडा-पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी विनवणी बळीराजाकडे केली जाते.