विनामास्क असल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंना 100 रुपये दंड; नियमांचे पालन झालेच पाहिजे – भरणे
पुणे | भाषण सुरु असताना अचानक मास्क सटकल्याने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी 100 रुपये दंड दिला आहे. हा दंड त्यांनी स्व:तहून दिला. यावेळी त्यांनी इतरांनादेखील मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी ते इंदापुरात आले होते.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते जंक्शन येथील एका खासगी दुकानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी काही नागरिक विनामास्क कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होते.राज्यमंत्र्यांच्या नजरेतुन हि बाब सुटली नाही. यावेळी भरणे यांनी नागरिकांना कोरोना अद्याप गेलेला नाही. आवश्यक नियमावलीचे पालन करा, सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, असे आवाहन करत साद घातली. याचवेळी अनावधानाने भरणे यांच्या तोंडावरील मास्क खाली आला. मात्र, हीदेखील चूक आहे. मंत्र्यांनादेखील नियम बंधनकारक आहेत. याच जाणिवेतून भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा 100 रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरुन त्याची रितसर पावती फाडली. गर्दी वाढत असताना कोरोना रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे सामाजिक भान सर्वांनीच जपण्याची नितांत गरज आहे. राज्यमंत्री भरणे यांनी हा संदेश दिला.
दरम्यान, इंदापूरमध्ये अनेक ठिकाणी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. इंदापुरात दिवाळीच्या तोंडावर रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.