Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव विसर्जनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात; सीसीटीव्ही मधून करडी नजर!

Spread the love

पुणे | घरगुती गणपतीचे घरच्या घरी, सोसायटीत किंवा फिरत्या हौदात, तर मंडळांच्या गणपतींचे तेथील हौदातच विसर्जन करा, असे आवाहन करतानाच पुणे पोलिस गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. तब्बल साडे सहा हजार पोलिस मंगळवारी घाटावर, रस्त्यावर, मंडळ परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त करणार आहेत. “गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पुणेकरांनी अतिशय संयम दाखवित इतरांना आदर्श घालून दिला आहे. त्याच पद्धतीने विसर्जनाच्या दिवशी देखील पुणेकरांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन घडेल,” अशी अपेक्षा पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केली आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव संपन्न होत आहे. मागील दहा दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळांनी पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यास प्राधान्य दिले. दीड, तीन, पाच आणि सात दिवसांच्या घरगुती गणपतींचे मोठ्या प्रमाणात घरच्या घरी किंवा हौदात विसर्जन करण्यात आले. तसेच अनेक नागरिकांनी मूर्तीदान करण्यालाही पसंती दर्शविली. आता मंगळवारी होणाऱ्या विसर्जनाच्या दिवशी देखील पुणेकरांकडून हाच प्रतिसाद मिळावा, यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात नागरीक दर्शनासाठी रस्त्यावर येत असल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करुन त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. विशेषतः गटागटाने येणाऱ्यांना पोलिसांनी समज देऊन परत पाठविले. त्याच पद्धतीने विसर्जनाच्यादिवशी देखील गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त, बॅरीकेड लावून नाकाबंदी केली जाणार आहे. गैरसमजातून लोक एकत्र येऊ नयेत, लोकांनी नियम पाळावेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त असणार आहे, असे डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले आहे.

असा असेल बंदोबस्त 
* साडे सहा हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर 
* बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) राहणार कार्यरत 
* जलद कृती दलही ठिकठिकाणी असणार तैनात 
* गुन्हे शाखेच्या पथकांचाही असणार ‘वॉच’ 

Exit mobile version