Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

दौंड तालुक्यातील राहू गावात डॉक्टरांसह कुटुंबासही कोरोनाचा विळखा!

Spread the love

दौंड | दौंड तालुक्यातील राहू येथील एका खासगी डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याची माहिती राहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन पांढरे यांनी दिली. दौंड तालुक्यामध्ये सध्या कोरोना विषाणूचे रुग्णांची सातत्याने वाढ होत चालली आहे. या कार्यकाळात कोरोना योद्धा म्हणून काही डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावले आहे. मात्र, या कोरोनाच्या वेढ्यातून डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय सुटू शकले नाहीत. यापूर्वी दौंड तालुक्यातील केडगाव व पाटस परिसरातील डॉक्टर कोरोनाबाधित आढळून आले होते. राहू येथील डॉक्टरांच्या कुटुंबातील त्यांचे वडील, आई, पत्नी व लहान मुलगी देखील कोरोनाबाधित आढळून आली आहे.

राहू येथे सध्या सर्वत्र व्यवहार सुरू झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढू लागली आहे. याचा परिणाम कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यात होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना पडताना तोंडाला मास्क अथवा रुमाल लावावा. जवळ सॅनिटायझर बाळगावे. सोशल डिस्टन्स पाळावा, असे आवाहन डॉ. मोहन पांढरे यांनी केले आहे. राहू गावामध्ये पुन्हा निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या करण्यात येणार आहेत. नागरिकांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.  नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गावामध्ये कोणीही घबराटीचे वातावरण निर्माण होईल, अशा सोशल माध्यमाद्वारे अफवा पसरू नये, असे आव्हान राहूचे सरपंच दिलीप देशमुख, उपसरपंच गणेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी गोरख थोरात, पोलिस पाटील सुरेश सोनवणे यांनी केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लग्न, पूजा, इतर धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम कोणी घेऊ नये. परिसरातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबातील वयोवृद्ध व लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन दौंडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी केले.

Exit mobile version