★पुण्यातील सर्व प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक व डॉक्टरांशी साधला संवाद
★खाजगी रुग्णालय व्यवस्थापनासाठी 5 समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
★रुग्णालयांनी कोविड रुग्णांसाठी अधिक बेड उपलब्ध करावेत
★समाजातील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया
★लक्षणे नसणाऱ्या रुग्णांच्या गृह अलगीकरणावर भर द्यावा
★प्रशासन आणि डॉक्टरांनी समन्वयाने काम करावे
पुणे | कोरोना रुग्णांना बेड व वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांनी उपलब्ध बेड व अन्य आवश्यक माहिती डॅशबोर्ड वर अचूक व वेळेत नोंदवावी, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी केल्या. खाजगी रुग्णालय व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 5 समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, ससून हॉस्पिटलचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, तसेच पुण्यातील खाजगी रुग्णालयांचे व्यवस्थापक, पदाधिकारी व प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
श्री. राव म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत प्रशासन कार्यरत आहे. पुण्यात 9 मार्चला पहिला रुग्ण आढळला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी आणखी बेड उपलब्ध करुन द्यावेत. दोन इमारती असणाऱ्या रुग्णालयांनी एक इमारत ‘कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित करुन त्यानुसार उपचार सुरु करावेत. त्याचबरोबर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करुन गृह अलगीकरणावर भर द्यावा. कोरोना बद्दल समाजात असणारे भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहनही श्री. राव यांनी केले.
प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनात समन्वय असणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. राव म्हणाले, यादृष्टीने उपजिल्हाधिकारी दर्जाचे 5 समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. रुग्णालयांतील बेड ची उपलब्धता, आकारण्यात येणारे शुल्क शासकीय नियमानुसार होत असल्याबाबत माहिती घेणे व अन्य वैद्यकीय सेवा सुविधांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे अधिकारी करतील, असे ते म्हणाले.
रुग्णालयांतील सेवा सुविधांची व बेड, व्हेंटिलेटर आदी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने डॅशबोर्ड वर बिनचुक व पारदर्शक माहिती नोंद करावी. रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करु नये. तसेच रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा होता कामा नये, असेही श्री. राव यांनी सांगितले.
यावेळी रुग्णालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा- सुविधा, रुग्णसंख्या वाढल्यास गृह विलगिकरणातील रुग्णांसाठीचा औषधोपचार, खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे शुल्क, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ड्यूटीचे वेळापत्रक व त्यांची निवासव्यवस्था, उपलब्ध ऑपरेशनल बेड, नॉन ऑपरेशनल बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, औषधासाठा, कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी व्यवस्था आदी बाबींचा सविस्तर आढावा श्री. राव यांनी घेतला.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, या रुग्णांसाठी अधिकाधिक बेड तयार करावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम व पवनीत कौर यांनी आवश्यक त्या उपाययोजना सांगितल्या. यावेळी भारती हॉस्पिटल, जहांगीर, रुबी, केईएम, ईनलॅक्स, नोबेल, सह्याद्री, इनामदार, दिनानाथ मंगेशकर, पूना हॉस्पिटल, देवयानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी डॅश बोर्ड चे सादरीकरण केले. याबरोबरच रुग्णालयांना येणाऱ्या अडचणी मांडल्या, तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.