कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांनी परिस्थिती लक्षात घेऊन प्लाझ्मा दान करा; पुणे पोलिसांकडून आव्हान!
पुणे | राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांइतकेच प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. त्यामुळेच डॉक्टरांपाठोपाठ पोलिसांनाही कोरोनाचा सामना करावा लागला. त्यामध्ये १३ हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाने ग्रासले, तर शंभरहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. असे असतानाही पोलिसांकडून कोरोनाविरुद्धची लढाई थांबली नाही. कोरोना रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणाऱ्या पोलिस प्रशासनाने आता प्लाझ्मादानासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि त्यांच्या टिमकडून प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मादाते उपलब्ध करुन देण्याची संकल्पना पुढे आणली. दरम्यान, पोलिस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते प्लाझ्मादान करणाऱ्या करण रणदिवे, मोहित नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत,राहुल लंगर, जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी आणि मोहित तोडी यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्र, संभाजी कदम, मितेश घट्टे उपस्थित होते.
…अशी केली आहे प्लाझ्मासंबंधीची व्यवस्था
कोरोनाबाधीत रुग्णांना प्लाझ्माची गरज लक्षात घेऊन त्यांना नोंदणी करण्यासाठी तसेच प्लाझ्मादात्यांनाही योग्य ठिकाणी प्लाझ्मा देता यावा, यासाठी पुणे पोलिसांनी http://puneplasma.in या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. १५ ऑगस्टपासून गरजू आणि प्लाझ्मादात्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्ती या वेबसाईटवर नोंदणी करून प्लाझ्मा दान करु शकतात, तर ज्यांना प्लाझ्माची आवश्यकता आहे, ते देखील या वेबसाईटवर नोंदणी करू शकतात.
इथे करा नोंदणी
वेबसाईट : http://puneplasma.in
व्हॉटस्अप : 9960530329
* पहिल्या दिवशीचे प्लाझ्मादाते – ४
* सध्या प्लाझ्मादात्यांची संख्या – १० ते २०
* आत्तापर्यंत उपलब्ध झालेले प्लाझ्मादाते – ४०५
* प्लाझ्मासाठी दररोज होणारी मागणी – दररोज १३ ते १४ जण