Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाबाबतची बारामतीकरांसाठी महत्वाची बातमी इथे होईल तुमची मोफत तपासणी

Spread the love

बारामती : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी बारामती नगरपालिकेमार्फत बुधवारपासून (ता. 16) अँक्टीव्ह सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक बारामतीकराची तपासणी दोन दिवसात केली जाणार आहे. बुधवार (ता. 16) व शुक्रवार (ता. 18) असे दोन दिवस ही तपासणी होईल. एक लाखांहून अधिक लोकांची तपासणी अवघ्या दोन दिवसात करण्याचे आव्हान नगरपालिकेने उचलले असून असे झाल्यास हा नवीन विक्रमच प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून हे दोन दिवस सर्व बारामतीकरांनी आपापल्या घरात थांबून येणा-या कर्मचा-यांना तपासणीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे.

दरम्यान आज बारामतीतील आठ विविध ठिकाणी या बाबतचे प्रशिक्षण संपन्न झाले. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटनेते सचिन सातव या प्रशिक्षणास उपस्थित होते.

लोकांनी तपासणीसाठी येण्यापेक्षा प्रशासनानेच लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. कालच बारामती तालुक्यातील माळेगाव, पणदरे व गुनवडी या तीन गावातील 32 हजार ग्रामस्थांची तपासणी झाली होती. आता बारामतीत दोन दिवसात एक लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट शासनाने निश्चित केले आहे.

बारामतीकरांनी तपासणी करावी…कोरोनाची साखळी तुटावी असाच प्रयत्न सर्वांचा आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायला हवे. वेळेवर तपासणी झाल्यास उपचारही वेळेवर मिळू शकतात. सर्वच नगरसेवक व कर्मचारी व अधिकारी मिळून ही मोहिम राबवली जाणार आहे. – सचिन सातव, गटनेते, नगरपरिषद, बारामती.

नागरिकांनी सहकार्य करावे….
नगरपरिषद व आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षकांच्या मदतीने ही मोहिम राबवतील. वैयक्तिक माहितीचे 15 मुद्दे असलेला एक फॉर्म प्रत्येक नागरिकांकडून भरून घेतला जाईल. तपासणीदरम्यान जास्त तापमान असणे, तीनपेक्षा अधिक लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोनाची तपासणी केली जाईल. त्यासाठी प्रत्येक प्रभागात टेस्टिंग सेंटर उभारणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रतिसाद द्यावा.- किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद

असा असेल हा कार्यक्रम
• बुधवारी तपासणी होणारे प्रभाग पुढीलप्रमाणे- 9 ,10, 11 ,12 15, 16, 18 व 19
• शुक्रवारी तपासणी होणारे प्रभाग पुढीलप्रमाणे- 1,2,3,4,5,6,7,8,13,14,17
• 375 पथकांद्वारे होणार तपासणी- एक पथक करणार 60 कुटुंबाची तपासणी
• 750 कर्मचारी करणार घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी
• प्रत्येक पथकात दोन स्वयंसेवकांचा समावेश.
• धो.आ. सातव शाळा, बालकल्याण केंद्र, शारदा प्रांगण शाळा, जि.प. प्राथमिक शाळा, तांदुळवाडी, जि.प. प्राथमिक शाळा रुई, व जि.प. प्राथमिक शाळा जळोची येथे तात्पुरते कोविड केअर सेंटर उभारले जातील.

Exit mobile version