Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

मराठा समाजाला दिलासा; आता अजित पवार ‘सारथी’

Spread the love

मुंबई | मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी ‘सारथी’ ही संस्था काम बघत असते. मात्र या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी योग्य ती पावले उचलली जात नसल्याच्या आरोप सतत होताना दिसत आहे. त्यामुळे आज ठाकरे सरकारने एक अध्यादेश काढत सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवली. अजित पवारांकडे असलेल्या नियोजन विभागाकडे ही जबाबदारी वर्ग करण्यात आली आहे.

सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र ओबीसी समाजाचे असलेले विजय वडेट्टीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या वडेट्टीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार अजित पवारांनीही सारथी संस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे असलेल्या नियोजन विभागाकडे घेण्याचे जाहीर केले होते. मात्र काँग्रेसचा सुरुवातीला याला विरोध होता. अखेर आज यासंदर्भात अध्यादेश काढून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या इतर योजनांची जबाबदारीही अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने  मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ‘सारथी’ संस्थेचा मुद्दा चर्चेत होता. मात्र आता सारथीची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हातात घेतली आहेत. मराठा समाजातील तरुणांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य विकासासाठी स्थापन करण्यात आलेली ‘सारथी’ ही संस्था बंद पाडण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातला आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी होत होता.

Exit mobile version