Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

दिवाळीपर्यंत 9वी ते 12वीच्या पर्यंतचे वर्ग उघडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!

Spread the love

मुंबई | मार्च महिन्यापासून मुलं घरात बंदिस्त झाले आहेत. ऑनलाईन अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीनंतर नववी ते बारावीच्या शाळा उघडण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा आदी उपस्थित होते.

दरम्यान, जागतिक स्तरावर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे भारतातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच, ‘ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जी मुलं आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तर शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी ही १७ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. तर २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंगदेखील होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याला एका बेंचवर बसवण्यात येईल. एक दिवसाआड वर्ग भरतील. विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावं. इतकंच नाही तर स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा असणार आहे. त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version