कोल्हापूर | छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना न्याय दिला. शिवरायांचे वंशज राजर्षी शाहू महाराजांनी सर्व जातींच्या बहुजनांचा उद्धार केला. तुम्ही त्या महापुरुषांचे वंशज आहात, मग तुमची अशी भूमिका का? असा प्रश्न एका विद्वान जाणकाराने विचारला.त्यांना अश्याप्रकारे युवराज संभाजीराजेंने दिले उत्तर;
शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारले. त्यावेळी परकीयांनी इथल्या भूमीपुत्रांवर जुलूम सुरू ठेवला होता. त्यामुळे महाराजांनी सर्वांमध्ये स्वाभिमान चेतवला. ज्याची जशी योग्यता तशी जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवली. हे करत असताना कोण उच्च जातीतला, कोण कनिष्ठ जातीतला हा भेद केला नाही. सर्वांना सोबत घेतले. विसाव्या शतकात राजर्षी शाहू महाराजांना लक्षात आलं, की जाती विषमते मुळे समाज खूप मागासला गेला आहे. सर्वदूर अज्ञानाचा काळोख आणि गरिबीमध्ये हा बहुजन समाज अडकून पडलेला आहे. तेंव्हा महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणाची व्यवस्था आणली. देशात पहिल्यांदा शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण लागू केलं. तेंव्हा अनेक समाजांना आधुनिक शिक्षण घेणं दुरापास्त होतं. सरकारी नोकरी तर दूरचा विषय. आज आपण जे आरक्षण बघतोय ती राजर्षी शाहू महाराजांची देणगी आहे. डॉ बाबासाहेबांनी हेच आरक्षण पुढे संविधानात ठेवले.
राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा समावेश होता. आज आरक्षणापासून हा समाज दूर आहे. कोण कुठल्या जातींत जन्माला आला म्हणून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतो. प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेप्रमाणे समान संधी मिळाली पाहिजे. आजच्या कायद्यानुसार जे आरक्षण मिळतं त्यात गरीब मराठ्यांना संधी मिळत नाही. राजर्षी शाहु महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणाचा कायदा लागू केला तो सर्व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. म्हणजे जो समाज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची ती उपाययोजना आहे. आज मराठा समाज मुख्यप्रवाहाच्या बाहेर फेकला गेला असल्याने त्याला खरी आरक्षणाची गरज आहे.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जाती विषमता कमी करण्यासाठी आरक्षणाचा फार मोठा उपयोग होतो. नाहीतर जो समाज वंचित आहे, मागासलेला आहे त्याला कायम आपल्यावर अन्याय होतो असे वाटणार आणी जाती-जातीत समाजामध्ये तेढ निर्माण होणार. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात आणि नंतरही विशिष्ट समाजांमध्ये ही भावना होती. आज तीच भावना मराठा समाजामध्ये आहे. यापेक्षा आरक्षणाच्या आधारे सर्वांना समान संधी देणे हे राज्यकर्ते म्हणून सरकारचे कर्तव्य आहे.
….आणि म्हणून मी अन्याय ग्रस्त मराठा समाजाची बाजू घेत आहे. राजकारण विरहित सामाजिक एकोप्यासाठी माझे प्रयत्न आहेत. ते मी शेवट पर्यंत करत राहणार. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून माझे ते परम कर्तव्य आहे.