मुंबई : शरद पवार या नावाचे राज्याच्या राजकारणात वलय आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. पवारांच्या नावाचा उदोउदो करा अथवा टीका त्याचे फळ मिळतेच. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण, गेल्याच महिन्यात भाजपाकडून विधानपरिषदेचे आमदार झालेल्या गोपीचंद पडळकरांना भाजपात मोठी लॉटरी लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे गोपीचंद पडळकर यांची भाजपाने थेट पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये आज 10 प्रवक्ते व 33 पॅनल सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभेवेळी भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
पडळकरांची पवारांवर टीका –
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना महाराष्ट्राला झालेला कोरोना म्हटले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पडळकरांनी अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमध्ये भाजपातून विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, पराभव स्वीकारावा लागला होता. अखेर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना विधानपरिषदेवर घेतले आहे.