पुणे | कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ या रोगावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी कष्ट करत आहेत. तसेच सरकार देखील आपल्या पद्धतीने लोकांना सुरक्षित व निरोगी राहण्याच्या सूचना देत आहेत. कोरोना महामारीपासून स्वतःला वाचवण्यासाठी अनेक उपाययोजना डॉक्टरांनी सांगितल्या आहेत. सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, मास्क वापरणे तसेच योग्य प्रमाणात औषधी काढ्याचे सेवन करणे, अशा अनेक सूचना डॉक्टर तसेच सरकारमार्फत देण्यात आल्या आहेत.
परंतु, पावसाळ्याच्या वातावरणात अनेकांना साधा, ताप, सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. सध्या कोरोना माहामारी असल्यामुळे आजारी पडायला लोक फार घाबरत आहेत. त्यामुळे, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या अनेक पदार्थांचा समावेश लोकांनी आहारात करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या काढ्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर लोक करत आहेत.
मात्र, कोणत्याही गोष्टीच्या अतिवापरामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. काढ्याच्या अतिसेवनाचेही अनेक दुष्परिणाम आहेत. कारण, काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा जास्त समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर काढ्याचे वेगवेगळे उपाय व्हायरल होत आहेत. त्यामुळे, अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
असे आहेत दुष्परिणाम
– काढ्याचे अतिसेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढते,
– एसिडिटी होणे,
– छातीत जळजळ,
– हात पायांची आग होणे,
– काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते,
– गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या अतिवापरामुळे शारीरिक समस्या निर्माण होतात.
या औषधी काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले, तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा.