मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला, याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना किला कोर्टात उभं केलं असताना न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची म्हणजे 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 109 कामगारांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आज मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याआधी कोर्टात घेऊन जात असताना सदावर्ते यांनी लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, माझ्या हत्येचा कट रचला जात आहे असा आरोप केला. न्यायमूर्ती के जी सावंत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील, महेश वासवानी, घनश्याम उपाध्याय यांनी बाजू मांडली. तर अॅड. प्रदीप घरत हे सरकारी बाजू मांडली.
गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांचा युक्तीवाद
गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने अॅड महेश वासवाणी यांनी बाजू मांडली. ST कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखे वागवले जात नव्हतं, 124 आत्महत्या झाल्या, त्यानंतर एकही नेत्याने जाऊन त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली नाही, असा दावा अॅड महेश वासवाणी यांनी केला. सदावर्ते यांनी बारामती यांच्या घराबाहेर आंदोलन करा म्हणाले, मुंबईतील घरात घुसून नाही, घरात घुसून हे शब्द राज्य सरकार घुसवत आहे, असा युक्तीवाद अॅड महेश वासवाणी यांनी केला. मैदानात जय श्रीराम आणि रघुपती राघव अशी भजन म्हटली जात होती, जय श्रीरामाच्या घोषणेमुळे त्यांच्या मागे कोणती शक्ती असावी अशी धारणा राज्य सरकारची झाली असावी असं अॅड महेश वासवाणी यांनी म्हटलं.
सदावर्ते तपासात सहकार्य करण्यास तयार असून जेव्हा घटना घडली तेव्हा सदावर्ते घटनास्थळी अनुपस्थित होते, सदावर्ते यांना एक दिवसही तुरुंगात ठेवता येईल असा गुन्हा त्यांनी केला नाही, पोलिस कोणालाही उचलून आणतील तर त्यांच्यावर खटला कसा काय चालवायचा, सदावर्ते यांनी पवार यांच्या घरात घुसून आंदोलन करा असं वक्तव्य कधी केले याबद्दल पोलिसांनी पुरावे द्यावे. आम्ही कारवाईला सामोरे जाऊ असं अॅड महेश वासवानी यांनी कोर्टात सांगतिलं. महेश वासवानी यांनी सदावर्ते यांचा जामिन सादर केला कोर्टात या जामिन अर्जाला सरकारी वकीलांनी विरोध केला.