पुणे | हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यान मेट्रोचे काम सुरू होणार आहे, त्यामध्ये हे पूल अडथळा ठरत आहेत त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील सर्वात मोठे आणि जुने 3 उड्डाण पूल एकावेळी न पाडता तीन टप्प्यात पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे. 30 दिवसात ते पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून वाहतूक कोंडीची टाळण्यासाठी 4 पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे पूल पाडण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल, असे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडून सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यात सर्वात कमी वाहतूक असलेल्या चतृशृंगी येथील पाषाण कडे जाणार पूल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेरकडे जाणारा आणि तिसऱ्या टप्प्यात औंध-वाकड कडे जाणारा पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पीएमआरडीकडून यावेळी सांगण्यात आले. पूल पाडताना वाहतूकीस अडथळा ठरू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
तसेच गणेशखिंड रस्त्यावर वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यांची देखील यावेळी पाहणी करण्यात आली. येत्या आठ ते दहा दिवसात प्रत्यक्षात पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे यावेळी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
दरम्यान आज महापालिका, वाहतूक पोलीस आणि पीएमआरडीचे अधिकारी यांची संयुक्तपणे विद्यापीठाची पाहणी केली. यावेळी स्थानिक रहिवाशी यावेळी उपस्थित होते.
एकावेळी संपूर्ण पूल न पाडता, तीन टप्प्यात ते पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.