मुंबई | आजच्या बैठकीत माझ्यासमोर घडलेला वृत्तांत..
बैठकीची अकराची वेळ होती आणि बैठक अजितदादांची असल्याने ती वेळेतच होते हे संबंध महाराष्ट्राला माहितीय. त्यानुसार आम्ही व इतर निमंत्रित सदस्य वेळेआधी आणि दादा करेक्ट वेळेवर पोहचले. एका हॉलमध्ये मिटिंग होती. स्टेजवर सोशल डिस्टन्सिंगच्यानुसार 3 खुर्च्या होत्या त्यावर अजितदादा पवार, विजय वडेट्टीवार आणि नवाब मलिक हे मंत्री बसले होते.
समोर असलेल्या खुर्च्यांवर एक खुर्चीवर एक बसला की 2 खुर्च्या सोडून तिसऱ्या खुर्चीवर दुसरा बसणार, याप्रकारे एका लाईनमध्ये 6 व्यक्ती बसू शकत होते. त्यानंतर दुसरी लाईन रिक्त आणि तिसऱ्या लाईनीत परत 6 जण बसणार अशाप्रकारची सोशल डिस्टन्सिंगने आसनव्यवस्था केली होती. म्हणजे कोणत्याही दोन रांगेत केवळ 6 व्यक्ती बसू शकत होते त्यानंतरच्या 2 रांगेत 6…
अगोदर आलेल्यापैकी आ.विनायक मेटे, विनोद पाटील व इतर चारजण पहिल्या रांगेत बसले. त्यांच्यामागे म्हणजेच तिसऱ्या रांगेत मी बसलो.
दादा म्हणाले, बरेच जण अजून आलेले दिसत नाहीत. अकराची वेळ होती, आता सव्वा अकरा होत आहेत. मग दादांनी मिटिंग सुरू केली. विनायक मेटेच्या निवेदनावर चर्चा झाली, त्यानंतर दादांनी विनोद पाटील यांना बोलण्याची संधी दिली. ते बोलत असतानाच संभाजीराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसह हॉलमध्ये आले.
राजेंनी सभागृहात नजर टाकताच आसनव्यवस्था त्यांच्या लक्षात आली आणि ते तिसऱ्या रांगेत अगदी माझ्या बाजूलाच असलेल्या रिकाम्या खुर्चीवर येऊन बसले. हे बघताच विनायक मेटे व विनोद पाटील यांनी उठून राजेंना त्यांच्या जागेवर पुढे येऊन बसण्याची विनंती केली. त्यावर राजेंनी नकार दिला.
त्यानंतर राजेंच्या एक दोन कार्यकर्त्यांनी त्यांना स्टेजवर बसण्यास जागा द्यावी. तुम्ही राजेंना खाली कस बसवू शकता? ते छत्रपती आहेत, त्यांचा अपमान करू नका वगैरे वगैरे भाष्य केलं. त्यावर तात्काळ राजेंनी उठून सांगितलं की, अरे मी छत्रपती म्हणून आलो नाही. मी मराठा समाजाचा सेवक म्हणून आलोय, आपण मिटिंगला आलोयत, मी इथे बसतो काही अडचण नाही. तरी कार्यकर्त्यांचा फॉर्म कमी होतच नव्हता.
तेवढ्यात दादा कार्यकर्त्यांना म्हणाले, तुम्ही प्रश्न सोडायला आलात की वाढवायला?
हे बघा संभाजीराजे मी मिटिंग तुम्ही, विनोद, विनायकराव, राजेंद्र आणि दुसरे दोघे तिघे एवढ्याच लोकांची घेणार होतो आणि तिथं टेबलवर आमनेसामने बसणार होतो. परंतु तुम्हीच म्हणालात मी माझ्यासोबत 8-10 माणस येतील म्हणून मला या हॉलमध्ये मिटिंग घ्यावी लागत आहे. आणि इथं सोशल डिस्टन्सने बसवलय सगळ्यांना.
इथं प्रश्न सोडवायला आलोत आपण. आणि मला सांगा राजे संसदेत कुठं बसतेत, त्यावर कार्यकर्ते म्हणाले ते सभागृह आहे. मग दादा म्हणाले, हे सभागृह नाहीतर काय आहे? आणि सारख समाज समाज काय लावलंय आम्ही काय आभाळातून पडलोय काय. मोठ्याने आवाज करू नका ही मिटिंग आहे.
संभाजीराजे तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं येऊन बसा आणि मी खाली बसतो.
त्यावर राजेंनी सांगतील की, पवार साहेब नाही नाही तुम्ही तिथेच बसा आणि मी इथं बसतो. मी इथं खासदार म्हणून आलो नाही आणि छत्रपती हा जनतेचा सेवकच असतो आणि मला इथं बसू द्या, मी व्यवस्थित आहे. अस कार्यकर्त्यांना सांगितलं.
तेवढ्यात विजय वडेट्टीवार यांनी आपली खुर्ची सोडली आणि राजेंना वर बसण्याची विनंती केली पण ते बसले नाही नंतर त्यांना दादांनी विनंती केली, राजे वर येऊन बसा आमच्या मंत्र्यांनी जागा दिली आहे तुम्हाला. तरी ते वर बसले नाही मात्र वडेट्टीवार नंतर खालीच बसले आणि मिटिंग सुरू झाली.
यात झालेल्या गोष्टी…
– राजेंनी माणसं जास्त आणली म्हणून टेबलवर आमनेसामने मिटिंग न घेता हॉलमध्ये घ्यावी लागली.
– स्टेजवर तीनच खुर्च्या होत्या त्यामुळे त्यावर तीन मंत्री बसले आणि ते संभाजीराजे यांच्या अगोदर आले होते.
– संभाजीराजे उशिरा आल्याने आणि सोशल डिस्टन्सिगच्या प्रमाणे आसनव्यवस्था असल्याने ते रिकाम्या दिसलेल्या तिसऱ्या रांगेतील खुर्चीवर बसले.
इथं त्यांना कोणी बसवलं वगैरे नव्हतं ते स्वतः बसले, त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जागा दिली तरी ते बसले नाही आणि नंतर प्रमुख 10 जणांच्या सोबत झालेल्या बैठकीत संभाजीराजे अजितदादांच्या बाजूला बसले होते.
त्यामुळे बाहेर बसून आभाळ हेपलू नका, नीट विषय माहिती घेत जा. राजेंच्या किंबहुना काही कार्यकर्त्यांनी केलेला एक स्टंट होता हा, त्यांच्याच एका पठ्ठ्याने हळूच video काढून मीडियाला पाठवला, त्यावरून बाहेर बातमी लागली आणि हा स्टंट झाला.
– निखिल कदम.
(दिनांक ९ जुलै, उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई)