बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत दोन घटनांवरून मिळाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये, असा चिमटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना काढला होता आणि चीन-भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. पवारसाहेबांचे नातू आणि अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी एक ट्विट केले. “भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना त्यांची जागा दाखवली. आमच्या सैन्याच्या अपूर्व शौर्याला सलाम. आमची सामूहिक व संघटित शक्ती दिसून आली.” असे पार्थ यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एकीकडे राष्ट्रवादीतील काही उथळ ठाणेदार नेते भारत-चीन तणावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत असताना तसेच एकूणच आमच्या लष्करी सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे करीत असताना पार्थ यांनी बिनदिक्कतपणे भारतीय सैन्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला.
पार्थ पवार यांनी गेल्या वर्षी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. पवार घराण्यातील पराभूत झालेले ते पहिली व्यक्ती होते. त्या पराभवानंतर पार्थ फारसे चर्चेत राहिले नाहीत. परंतु वर केलेले ट्विट आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यात निभावलेली भूमिका यामुळे ते अचानक चर्चेत आले आहेत. ते पुन्हा सक्रिय होतील असे आता त्याच्या समर्थकांना वाटत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे शिल्पकार होते. त्यावेळी या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये असा अलिखित करार होता की, दोन्ही पक्षांनी एकमेकांची माणसे पळवायची नाहीत. एकमेकांचा पक्ष कुठेही फोडायचा नाही. हा करार बरीच वर्षे पाळला गेला. मात्र युतीची पुन्हा २०१४ मध्ये सत्ता आली आणि नंतरच्या काळात भाजपमधून शिवसेनेत आणि शिवसेनेतून भाजपमध्ये अनेकांनी उड्या घेतल्या. दोन्ही पक्षांची विचारधारा एकच होती तरीही हे घडले. आता तर भिन्न विचारांचे पक्ष सत्तेत आहेत. त्यामुळे पारनेरसारखे प्रसंग वरचेवर घडत राहतील. त्याची सुरुवात पारनेरच्या निमित्ताने पार्थ पवार यांच्या माध्यमातून झाली. खरे तर पार्थ यांचे चुलतबंधू रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. ते अतिशय सक्रिय आहेत. असे असताना पारनेरचे ऑपरेशन घड्याळ हे त्यांनी न करता पार्थ पवार यांनी करावे याला वेगळे महत्त्व आहे.
लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहित हे शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून अचानक समोर आले. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. रोहित हे त्यावेळी सातत्याने पवारसाहेबांसोबत राहात. पार्थ यांना उमेदवारी देण्यावरून किंवा शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून न लढवण्याचा घेतलेल्या निर्णयावरून रोहित आणि अजित पवार यांच्यात कुठे तरी संघर्ष असल्याची बाब चर्चेत आली होती. पुढे बऱ्याच घटना घडल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजितदादा गेले खरे; परंतु पवारसाहेबांच्या आदेशानंतर ते माघारी फिरले. पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या पंखाखाली अख्खे कुटुंब एकदिलाने राहात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ हे थोडे बाहेर फेकले गेले. आता ते पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. पवार घराण्यातील एक उमदा तरुण पराभवाचे शल्य विसरून पुढे येऊ पाहात आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे.
आपल्याकडे एखाद्या नेत्याला वाईट म्हटले की, त्याची वाईट बाजू मांडण्याची अतिशय वाईट सवय आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवार. शब्दाला जागणारे, कडक शिस्तीचे, प्रशासनाची उत्तम जाण असलेले दिलदार नेते म्हणजे अजित पवार. परंतु एका विशिष्ट चष्म्यातून त्यांच्याकडे बघितले गेले आणि त्यांच्यातील गुणांकडे दुर्लक्ष झाले. पार्थ पवार नव्या उमेदीने राजकारणात सक्रिय होऊ पाहात असतील तर त्यांच्याकडेही पूर्वानुभवाच्या चष्म्यातून बघणे योग्य ठरणार नाही.