बारामती – अवघ्या काही दिवसात ‘करोना मुक्त’ झालेल्या बारामतीत पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. मागील दोन दिवसांपासून बारामतीतील करोना रुग्णांचा आलेख वाढूू लागल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि.१५ जुलै पासून बारामती अनिश्चित कालावधीत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बारामतीत काल रविवार (दि.१२) रोजी एकाच दिवशी तब्बल १८ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली होती. बाधितांच्या संपर्कात असणाऱ्यांची करोना चाचणी घेतली असता आज पुन्हा नव्याने ५ करोना बाधितांची भर पडली आहे. बारामतीत दोन दिवसात २३ करोना बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुढील काही दिवस बारामती पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून नगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुरुवार दि 16 पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
करोनाने बारामतीत शिरकाव करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून तात्काळ ‘राजस्थान स्थित’ भीलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर ‘बारामती पॅटर्न’ राबविण्यात आला. व तो यशस्वी ही झाला. या पॅटर्नमुळे बारामती काही दिवसातच करोना मुक्त झाली. दरम्यान येथील व्यापाऱ्यांच्या आग्रहावरून काही अंशी टाळेबंदी चे नियम शिथिल करून पुन्हा बाजारपेठा सुरु करण्यात आल्या होत्या.
बाजारपेठा सुरू झाल्याने बारामतीत पुन्हा गर्दी ओसंडू लागली होती.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने दुकाने चालू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना काही नियम व अटी घालून दिल्या होत्या. पैकी दुकानात सामाजिक अंतर राखले जावे, थर्मल कॅनिंगची मशीन ठेवणे, ग्राहकाची नोंद घेण्यासाठी रजिस्टर ठेवणे या सारख्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे खऱ्या अर्थाने रुग्ण संख्या वाढली व टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला.